शशी करपे,
वसई- वसईतील पाली गावातील फेलिक्स मच्याडो (८५ वर्षे) यांच्या बोअरिंगला १८ वर्षांपूर्वी खारे पाणी लागले. पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नव्हती. त्यांनी एक भन्नाट कल्पना लढवली. पावसाचे पाणी मोठ्या टँकमध्ये भरले आणि वर्षभर पिण्यासाठी त्याच पाण्याचा वापर केला. तेव्हापासून मच्याडो कुटुंबीय पावसाचेच पाणी पिऊन तहान भागवत आहेत. यंदा आॅगस्टपर्यंत पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा त्यांच्या घरात आहे. पाली गाव खाडीपासून जवळ असल्याने विहिरी आणि बोअरिंगला खारे पाणी येते. त्यामुळे पाणीटंचाई नेहमीच भेडसावते. फेलिक्स यांनी पावसाचे पाणी साठवले आणि त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला. बंगल्याच्या कौलावर पडणारे पावसाचे पाणी पाइपद्वारे खाली आणून कॉटनच्या कपड्याने गाळून अंगणातील मोठ्या टाक्यांमध्ये जमा केले जाते. त्यानंतर टाक्या सील करून सावलीत ठेवण्यात येतात. अवघ्या दहा-पंधरा दिवसांत वर्षभर पुरेल इतका आठ ते दहा हजार लीटर पिण्याच्या पाण्याचा साठा होतो. मग वर्षभर हेच पाणी उकळून पिण्यासाठी वापरले जाते. >१०-१५ दिवसांची मेहनतपाणी भरण्यासाठी फक्त १०-१५ दिवस थोडी मेहनत घ्यावी लागते. पावसाळा सुुरू झाला की पहिल्या १५-२० दिवसांत कौले साफ होतात. त्यानंतर पाणी साठवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. मुसळधार पाऊस पडेल तेव्हाच पाणी साठवण्याचे काम केले जाते. मग, कधी कधी त्यासाठी रात्र जागवावी लागते. >मच्याडो यांची खंत ही योजना यशस्वीपणे राबवली जात असली तरी त्याचे कुणीही अनुकरण करायला तयार नाही. अनेक नातेवाइकांना पटवून देऊनही कुणी रस दाखवला नाही, अशी खंत मच्याडो यांनी व्यक्त केली. आमच्या घरच्यांना मात्र या पाण्याशिवाय दुसरे पाणी गोड लागत नाही, असेही मच्याडो सांगतात.