संतोष वानखडे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १२ - यावर्षी रिसोड तालुक्यात आतापर्यंत अपेक्षीत सरासरीपेक्षा १८ टक्के जास्त पाऊस झाला. तथापि, एकूण १७ प्रकल्पांत सरासरी केवळ २५ टक्के जलसाठा असल्याने शेतक-यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. याऊलट वाशिम तालुक्यात अपेक्षीत सरासरीएवढाही पाऊस नसताना, एकूण ३२ प्रकल्पांत सरासरी ८९ टक्के जलसाठा आहे.
गत तीन वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होत आला आहे. यावर्षी पावसाने सुरूवातीला दमदार प्रवेश करून सर्वांनाच सुखद धक्का दिला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १२५ प्रकल्पांत ११ सप्टेंबरपर्यंत सरासरी ७२ टक्के जलसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या दप्तरी आहे. रिसोड तालुक्यातील जलप्रकल्पांच्या परिसरात दमदार पाऊस न झाल्याने आतापर्यंत केवळ सरासरी २५ टक्के जलसाठा आहे. शेतकºयांसाठी सिंचनाच्या दृष्टिकोनातून ही धोक्याची घंटा आहे. रिसोड तालुक्यात १ जून ते ११ सप्टेंबर २०१६ या दरम्यान एकूण ७४२ मीमी पाऊस पडल्याची नोंद आहे. हा पाऊस अपेक्षीत सरासरीपेक्षा १८ टक्क्याने जास्त आहे. याऊलट वाशिम तालुक्यात अपेक्षीत सरासरीपेक्षा पाच टक्के पाऊस कमी पडला आहे. वाशिम तालुक्यात आतापर्यंत ८०४ मीमी पाऊस अपेक्षीत असताना प्रत्यक्षात ७७० मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. मात्र, या तालुक्यातील जलप्रकल्पांत सरासरी ८९ टक्के जलसाठा असल्याने शेतकºयांसाठी ही आनंदाची बाब आहे. मानोरा तालुक्यातील एकूण २३ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा आहे. मंगरुळपीर तालुक्यातील एकूण १५ प्रकल्पांत सरासरी ८२ टक्के जलसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील एकूण २१ प्रकल्पांत सरासरी ६४ टक्के जलसाठा आहे. कारंजा तालुक्यातील एकूण १४ प्रकल्पांत सरासरी ५९ टक्के जलसाठा आहे. रिसोड तालुक्यातील वरूड बॅरेजमध्ये केवळ १०० टक्के जलसाठा असून, त्याखालोखाल गणेशपुर ८५, कुकसा ७८, पाचंबा ६६, जवळा ५७, वाडी रायताळ ५१, नेतन्सा ५०, हराळ ४६, मांडवा ४१, गौंढाळा ३८ टक्के जलसाठा आहे. उर्वरीत सर्व प्रकल्पांत ३० टक्क्यापेक्षा कमी जलसाठा आहे.