वसई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होत आली असली तरी आदिवासी विकासमंत्र्यांच्या जव्हार गावातील २८ पाडे मात्र, अजूनही अंधारातच चाचपडत बसले असून त्यांना तत्काळ वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी केली आहे.जव्हार तालुक्यातील पाचबुड, खैरमाळ, निरपंचमाळ, रहादेपाडा, खेटरीपाडा, पाचबुड्यापाडा, कडवेचीमाळ, पाटीलपाडा, सुरळीपाडा, कानटपाडा, गोंड्याचापाडा, भट्टीपाडा, उंबरपाडा, सुकर्डीपाडा, मनमोहाडी, दखनेपाडा, शुंगारपाडा, घाटाळपाडा, खिडसे, रहाटपाडा, सागपाडा, डोंगरपाडा, बांबरेपाडा, आंब्याचापाडा, बंद्रयाचीवाडी, निळमाळ ही २८ गावे आजही अंधारात चाचपडत बसली आहे. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षातही त्यांना वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने दीनदयाळ उपाध्याय विद्युतीकरण योजना अंमलात आणली आहे. दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या योजनेत या २८ पाड्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.महावितरणने या पाड्यांचे विद्युतीकरण करण्यासाठी योजना तयार केली होती. ती कागदावरच राहिली आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा, हतबलतेचा आणि असहायतेचा गैरफायदा घेऊन प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे.त्यांचा अंत न पाहता त्यांना तत्काळ वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी चोरघे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
जव्हारमधील २८ पाडे अंधारातच
By admin | Published: November 19, 2016 3:32 AM