औरंगाबाद : मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा फेब्रुवारी महिन्यातच ३ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने पावसाळ्यापर्यंत करायचे काय़़, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यातील अन्य सहा प्रकल्पांची अवस्था तर आणखी भीषण झाली असून, त्यांचा उपयुक्त जलसाठा शून्य टक्क्यावर आला आहे. मराठवाड्यात ११ मोठी धरणे आहेत. विभागातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ ७५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. जायकवाडी धरणाची क्षमता २ हजार १७१ दशलक्ष घनमीटर आहे. मागील आठवड्यात जायकवाडीत ९९ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा होता. आठ दिवसांत पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊन तो ७५ द.ल.घ.मी.पर्यंत खाली आला आहे. हा जलसाठा केवळ ३ टक्के असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मागील ५ वर्षांतील जायकवाडीत १२ फेब्रुवारीची उपयुक्त जलसाठ्याची आकडेवारी पाहिली असता २०१३ मध्ये ९५ द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा होता. २०११मध्ये धरणाच्या ऊर्ध्व भागात मुबलक पाऊस झाल्याने जायकवाडीत ५३.१५ टक्के पाणी होते. २०१२मध्ये ३१.२२ टक्के जलसाठा होता. २०१४मध्ये १९.४३ टक्के उपयुक्त पाणी होते आणि गतवर्षी २०१५मध्ये जायकवाडीत ५१४ द.ल.घ.मी. म्हणजे २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. येलदरी (जि.परभणी) प्रकल्पात ६ टक्के, ऊर्ध्व पेनगंगा (जि. यवतमाळ)मध्ये १९ टक्के, विष्णुपुरी (जि.नांदेड) धरणात २१ टक्के तर निम्न दुधना (जि. परभणी) धरणात २५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. (प्रतिनिधी)मृत साठ्यातून पाणीपुरवठा!मराठवाड्यातील सिद्धेश्वर (जि. हिंगोली), माजलगाव (बीड), मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा (जि. उस्मानाबाद) आणि नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार धरणातील उपयुक्त जलसाठा मागील आठवड्यातच संपलेला आहे. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांना मृत साठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केवळ ३ टक्के उपयुक्त जलसाठा
By admin | Published: February 14, 2016 2:32 AM