पुणे : राज्यात मार्चअखेरच पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असून यंदा याच दिवशी सुमारे ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पाणीसाठा कमी झाल्याने राज्यभरात टँकरची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी राज्यात २० मार्च रोजी २१ गावे आणि ७३ वाड्यांमध्ये २९ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तर यंदा ३ हजार गावांत सुमारे ९४० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासकीय यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुंतलेली असतानाच राज्यातील पाणीटंचाईचे संकट गहिरे होताना दिसत आहे.
राज्यात यंदा पर्जयन्यमान कमी झाल्याने धरणांच्या साठ्यात फारशी वाढ झाली नाही. त्यातच परतीचा पाऊस न झाल्याने नद्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे धरणांच्या साठ्यांतही झापाट्याने घट होत आहे. सध्या राज्यभरातील लहान-मोठ्या अशा दोन हजार ९९४ धरणांमध्ये केवळ ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५५.८५ टक्के होता. सर्वांत गंभीर स्थिती मराठवाड्यात असून येथील धरणांमध्ये केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये ४६ टक्के जलसाठा शिल्लक होता.पुणे विभागातील धरणेही आटू लागली असून गेल्या वेळच्या ७० टक्क्यांच्या तुलनेत या वेळी केवळ ४२.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
नाशिक विभागात मोठ्या प्रमाणात धरणे असूनही फक्त ४०.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या तुलनेत नागपूर, अमरावती आणि कोकणातील धरणांत अजूनही निम्मा पाणीसाठा आहे. ग्रामीण भागात टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार ८६० गावे आणि २०५४ वाड्यांमध्ये ९४० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक ३०० गावे-वाड्यांना ३८१ टँकरने, नाशिक विभागात ९०० गाव-पाड्यांमध्ये २७१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पुणे विभागात २५ मार्च रोजी २६५ गावांना तसेच १ हजार ५८७ वाड्यांना ३१० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक १४३ टँकर सातारा जिल्ह्यात असून येथे १३२ गावे व ५४० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील ३४ गावे व ३१४ वाड्यांना ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.