हुसेन मेमन,जव्हार- मार्च महिना संपला आणि जव्हार तालुक्यातील तब्बल पंधरा गावांच्या घशाला कोरड पडल्याची आकडेवारी समोर आली आहे. प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यातील सात गावांना तीन टॅँकरच्या सहाय्याने एक दिवसा आड पुरवठा सुरु करण्यात आला असून आठ गावांची मागणी जव्हार पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे अद्याप विचाराधीन आहे. तालुक्यातील पाचबुड, सागपणा, रिटीपाडा, कासटवाडी, जांभळीचामाळ, जनीजव्हार, कातकरीपाडा या गावांना यावर्षी मार्च महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. त्यामुळे पुढील एप्रिल व मे महिना कसा घालवायचा असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. ज्या गावांना पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. त्या गावातील विहिरींंनी तळ गाठला आहे. त्यातच जव्हार पंचायत समितीकडे तीन टँकर असल्याने दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. जव्हार पंचायत समितीकडे आठ पाणी टंचाई गावांचे नवीन प्रस्ताव येवून पडले आहेत. खरंबा, कौलाळे, पवारपाडा, कुंडाचापाडा, नंदनमाळ, घिवंडा, पिंपळपाडा, न्याहाळे यांचा त्यामध्ये समावेश आहे.गुरढोरे नदीकाठच्या माळरानावरजव्हारच्या ज्या गावांना पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. त्या गावातील गुरांंचे करायचे काय असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. गुरे व जनावरांना पाणी पिण्यासाठी अधिक लागत असल्याने घरातील जनावरे गाई, बैल, म्हशी घरातुन नदीकाठी सोडले आहेत.वाद नको म्हणून असा तोडगादिवसाआड टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने हंडाभर पाण्यासाठी वाद देखील निर्माण होत आहेत. विहिरीवरून पाणी भरण्यासाठी त्रास झाला तरी चालेल मात्र पाण्यावरून वाद नको म्हणून पाण्याचा आलेला टँकर विहिरीत सोडण्यात येत आहे.>बालशेतपाडा गाव तहानेने व्याकूळवाडा: तालुक्यातील बालशेतपाडा या जवळपास तीनशेची लोकवस्ती असलेल्या गावातील ग्रामस्थ तहानेने व्याकुळ झाले असून पाणीपुरवठा योजना ठेकेदाराने घशात घातल्याने पाण्यासाठी २ किलोमीटरची पायपीट लोकांना करावी लागत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. शहरापासून नजीकच असणाऱ्या बालशेतपाडा गावात सध्या प्रचंड पाणीबाणी सुरु आहे. या गावासाठी मांडावा-बालशेतपाडा या नावे पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. ज्यासाठी गारगाई नदीतून पाणी आणण्याचे नियोजन होते. मात्र, या योजनेचे पाणी लोकांना प्यायला मिळालेच नाही असे, बालशेतपाडा वासीयांचे म्हणणे आहे. गावात विहिरी व बोअरवेल आहेत. आता या स्त्रोतांना पाण्याचा एक थेंबही शिल्लक नसल्याने पाण्यासाठी लोकांना गवळीपाडा किंवा मांडावा या ठिकाणी तब्बल २ किमी पायपीट करावी लागते. ही बहुतांश गाव आदिवासी लोकवस्तीचा असल्याने लोकांना पाण्यासाठी मजुरीला जाणे जमत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबावर एक वेळच्या जवणाची वेळ आली आहे. पाण्यासाठी वृद्ध, महिला, लहान मुले, विद्यार्थी अशा सर्वांनाच डोक्यावर हंडा घ्यावा लागतो असे चित्र आहे. योजनेबाबत विचारले असता ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केल्याने तिची माहिती ग्रामपंचायतीकडे असावी अशी उडवाउडवी करण्यात आली. त्यामुळे आता गावातील आटलेल्या विहिरींमध्ये पंचायत समिती विभागाने टँकर द्वारे किमान पिण्यापुरते पाणी तरी टाकावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या ठेकेदारांनी चालविलेल्या या अमानुष उद्योगांना कुणीतरी आवर घालावी अशी मागणी केली जात आहे.
कोरड पडलेल्या १५ पैकी ८ गावांनाच पाणी
By admin | Published: April 03, 2017 3:52 AM