महायुतीत फक्त ८० जागांवरच चर्चा होणार, उर्वरित जागांचा प्रश्नच येत नाही; आशिष शेलारांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:17 AM2024-09-26T10:17:14+5:302024-09-26T10:17:54+5:30
Mahayuti BJP Seat Sharing Claim: भाजप काही केल्या १५० जागांखाली येण्याची शक्यता नाहीय. यामुळे शिंदेसेना व अजित पवार गटाच्या वाट्याला १३३ जागा येतील.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. तिन्ही आघाड्यांच्या बैठकांवर बैठका सुरु झाल्या आहेत. दिल्लीतून नेतेमंडळी येत आहेत. महाराष्ट्रात जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरु झाले आहे. मला जास्त-तुला कमी, तुला का जास्त, मला का कमी अशी चर्चा रंगली आहे. अशातच भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी महायुतीच्या जागावाटपावर मोठे वक्तव्य केले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले आहेत. भाजपने १५० ते १६० जागा लढाव्यात आणि मित्रपक्ष असलेली शिंदेसेना आणि अजित पवार गटाने उर्वरित जागा लढवाव्यात, असे शाह यांनी सुचविल्याची खात्रीलायक माहिती आहे. भाजप काही केल्या १५० जागांखाली येण्याची शक्यता नाहीय. यामुळे शिंदेसेना व अजित पवार गटाच्या वाट्याला १३३ जागा येतील. शिंदे यांच्यासोबत स्वत:चे ४० व १० अपक्षांसह ५० आमदार आहेत. अजित पवार गटाकडे काँग्रेसच्या तीन आमदारांसह ४४ आमदार आहेत. शिंदे व अजित पवार गट मिळून आमदार संख्या ९४ इतकी आहे.
भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष शेलार यांनी बुधवारी जो दावा केला आहे त्यावरून अजित पवार गट आणि शिंदे गटात चिंतेचे वातावरण असणार आहे. जे आमदार आहेत त्या जागांवर जागा वाटपाची चर्चा होणार नसल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. आमच्याकडे २०८ आमदारांचा पाठिंबा आहे. यामुळे वाटपाच्या बैठकांत यावर चर्चा करण्याची गरजच नाहीय. उरलेल्या ८० जागांवर वाटपाची चर्चा केली जाणार आहे, असे शेलार म्हणाले.
मविआ तुटणार...
विधानसभा निवडणुकीच्या आधीच विरोधकांची महाविकास आघाडी फुटणार आहे, असाही दावा शेलार यांनी केला आहे.
अजित पवारांचे जागावाटपावर म्हणणे काय...
ज्या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लडत झाली होती त्या ठिकाणी आमच्यात चर्चा झाली आहे. तालुका स्तरावर पेच आहे पण वरती सुटला आहे. अमित शहांबरोबर चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.