'भ्रष्टाचारमुक्त भारतच्या केवळ वल्गनाच; सर्व भ्रष्ट नेत्यांना भाजपाकडूनच सुरक्षाकवच', नाना पटोलेंंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 02:42 PM2024-02-22T14:42:28+5:302024-02-22T14:43:46+5:30
Nana patole Criticize BJP : भारतीय जनता पक्षाच्या ३०३ खासदारांमध्ये विरोधी पक्षातातील ज्या १६५ जण आहेत तर काँग्रेसचे ६७ जण आहेत, ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे काय भ्रष्टाचारमुक्त भारत करणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपावर घणाघाती टीका केली आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची वल्गना भारतीय जनता पक्षाने केली होती परंतु ज्या लोकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजपात घेऊन भ्रष्टाचारयुक्त भाजपा केला आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
नाना पटोले म्हणाले की, निवडणुका आल्यामुळे विरोधी पक्षांच्या लोकांवर सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकल्या जात आहेत. परंतु भाजपाच्या एकाही भ्रष्ट नेत्यावर कारवाई केली जात नाही. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची वल्गना भारतीय जनता पक्षाने केली होती परंतु ज्या लोकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजपात घेऊन भ्रष्टाचारयुक्त भाजपा केला आहे. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटळ्याचा आरोप केला त्यांच्यावर छापे टाकले का? उलट त्यांना सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री केले. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत केला व त्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपात घेऊन राज्यसभा खासदार केले. भाजपाने भ्रष्टाचारी लोकांनी सुरक्षाकवच दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ३०३ खासदारांमध्ये विरोधी पक्षातातील ज्या १६५ जण आहेत तर काँग्रेसचे ६७ जण आहेत, ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे काय भ्रष्टाचारमुक्त भारत करणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रीतपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
राज्य निवड मंडळाच्या बैठकीआधी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्रात मविआ आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व मुद्द्यांवर सहमती झालेली आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे, लोणावळा येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. या शिबिरात संघटन मजबुत करण्याविषय़ी चर्चा झाली आहे, मुंबई काँग्रेसच्या तयारीचा आढावाही घेतला जात आहे.