- दयानंद काळुंखे, अणदूर (जि. उस्मानाबाद)
ग्रामस्वच्छता अभियानात गावाला यशाचे तोरण बांधणाऱ्या, तसेच जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून गावासाठी शाश्वत पाण्यासाठी झगडणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी गावावर आज मोठे जलसंकट ओढवले आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत खुदावाडी गावासह तीन तांडे आणि एका वस्तीचा समावेश असून, येथील एकूण पाच हजार लोकसंख्येची तहान केवळ दोन टँकरवर भागविली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करून पाण्याचा शोध घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.शिवारातील शेतीलाच नव्हे, तर माणसाला प्यायला पाणी नाही. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न तितकाच गंभीर बनला आहे. मार्च अखेरीस गावात दीड हजार ते अठराशे पशुधन होते, ते आता हजाराच्या आसपास आले आहे. दहा-पंधरा दिवसांतून एक वेळा पाणी उपलब्ध होत आहे. गावात दोन जुने आड असून, सर्वांना समान पाणी मिळावे या उद्देशाने टँकरचे पाणी या आडात टाकून रहाटाद्वारे ते शेंदून घ्यावे लागत आहे, तसेच गावच्या शेजारी असलेल्या एका ३५ फूट खोल विहिरीतील अस्वच्छ पाणी महिला कपडे धुण्यासाठी वापरत आहेत. मजुरांची भटकंतीमनरेगा अंतर्गत येथे जवळपास दीडशे मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले होते, परंतु ते बंद होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. आता कोणतीच कामे सुरू नसल्याने जवळपास सहाशे मजूर रोजगारासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. गावात चारा डेपो निमारण झाल्यास किमान मुक्या जनावरांची तहान-भूक भागविणे शक्य होईल. दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन शिवारात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ओढे, नाल्याचे सरळीकरण, खोलीकरण करण्याचे नियोजन असून, यासाठी आतापर्यंत एक लाख रुपयांचा लोकवाटा जमा झाल्याचे समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी सांगितले.खुदावाडी येथील साठवण तलावातील पाच विहिरीतील गाळ काढून त्यातील पाणी एकत्रित करून ते गावाला पुरविले जात होते. सध्या मंजूर झालेल्या टंचाई निधीतून साठवण तलावातील विहिरीचे काम सुरू असल्याचे सरपंच रेवणसिद्ध स्वामी यांनी सांगितले.