बीड : दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ घोषणांचा पाऊस पाडला, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेला दुष्काळाचे गांभीर्य आहे म्हणूनच आज आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आलो आहोत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.बीड शहरातील एका मंगल कार्यालयात शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील १ हजार गरीब कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची थेट मदत देण्यात आली. या वेळी ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षीही दुष्काळ पडला होता; परंतु त्या वेळी शिवसेना विरोधी पक्षात होती. आता सत्तेवर आलो असल्याने जबाबदारी वाढली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असे म्हटले जात आहे. माफी द्यायला ते काय गुन्हेगार आहेत. त्यांना कर्जमुक्त केले पाहिजे अशी आमची आजही मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मूळ कर्जाच्या रकमेपेक्षा व्याज अधिक आकारू नये असा शासननिर्णय आहे. पण त्याची अंमलबजावणी होते की नाही याची पडताळणी शिवसैनिकांनी करावी, असेही ते म्हणाले. मी शेतकरी नसलो तरी त्यांचे अश्रू मी पाहू शकतो, असेही ठाकरे म्हणाले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांची केवळ घोषणाबाजी
By admin | Published: October 12, 2015 5:22 AM