नाशिक : राज्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिके नष्ट झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकार मात्र केवळ पोकळ घोषणा करीत असल्याचे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोडले.शेतकरी व जनतेला न्याय मिळण्यासाठी व दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हावा, यासाठी केंद्र सरकाराने राज्याला जास्त निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममधील एका धार्मिक कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले की, राज्यातील दुष्काळ हा कमी पावसामुळे निर्माण झाला तरी काही प्रमाणात मानवनिर्मितदेखील आहे. राज्य आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असूनही महाराष्ट्रावर अन्याय होत आहे.बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅकेज जाहीर करतात. त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची पाहणी करावी आणि पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून दुष्काळप्रश्नी चर्चा घडवावी. प्रश्नाचे गांभीर्य ओळखून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात दुष्काळ निवारणासाठी अधिक निधीची गरज असल्यास राज्य सरकारने कर्ज काढण्याची तयारी ठेवावी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सरकारकडून केवळ पोकळ घोषणा
By admin | Published: September 12, 2015 2:00 AM