कोल्हापूर : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे, तर मीडियात प्राबल्य वाढले आहे, असा टोला मारत, राणे सुधारले असतील तरच त्यांना भाजपमध्ये घ्यावे, असा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. राणेंपेक्षा माझी कामगिरी सरस आहे, असा दावाही केसरकर यांनी केला. कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केसरकर यांना पत्रकारांनी गाठून राणेंबाबत छेडले असता ते म्हणाले, कोकणात त्यांचे प्राबल्य वाढले हा राणे यांचा दावा खोटा आहे. कोकणात भाजप-शिवसेनेने चार नगरपालिका जिंकल्या. राणे मालवण नगरपालिका हरले आहेत. त्यांनी एकच नगरपंचायत जिंकली आहे. कोकणात शिवसेना-भाजप एकत्र आले तर राणेंचा उपयोग होत नाही. पण त्यांचा कसा वापर करावा याबद्दल मी कोणालाही सल्ला देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राणे एका गाडीतून अहमदाबादमध्ये फिरले होते याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कोकणात मी तत्वाची लढाई लढत आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. राणेंनी स्वत:ला सुधारले पाहिजे. ते सुधारले असतील तर खात्री करून त्यांना भाजपामध्ये घ्यावे, असा सल्लाही केसरकर यांनी दिला.
राणे सुधारले असतील तरच भाजपमध्ये घ्यावे!
By admin | Published: April 20, 2017 6:04 AM