- रोहित नाईक, मुंबई २५ राज्य, २२३ दिवस आणि १४ हजार किमीचा आव्हानात्मक प्रवास.. ७ जानेवारी २०१५ ला ठाण्यातून सुरुवात केलेल्या सचिन गावकर या अवलिया सायकलिस्टने १५ आॅगस्टला ठाण्यामध्ये परतून सायकलवरुन केलेल्या भारत परिक्रमेची यशस्वी सांगता केली. लडाख येथे भारतीय सेनेच्या जवानांनी ‘ऐसा काम सिर्फ मराठी आदमी ही कर सकता है, व्ही सॅल्युट यू’ अशा शब्दांत केलेले कौतुक खुप अभिमानास्पद असल्याचे सचिनने ‘लोकमत’सह बोलताना सांगितले. अस्थमाचा त्रास असूनही विशेष प्रशिक्षण घेऊन ही मोहिम यशस्वी केल्याने सचिन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.ठाणे येथील इन्स्टिट्यूट आॅफ सायकोलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या संस्थेसह १४ वर्षांपासून काम करणारे ३७ वर्षीय सचिन व्यवसायाने कला क्षेत्रात आहेत. त्यांनी जे. जे. स्कूल आॅफ आर्टमधून शिल्पकलेची पदवी प्राप्त केली आहे. या मोहिमेदरम्यान एकूण ११ वेळा सचिन यांची सायकल पंक्चर झाली. सुमारे साडेतीन हजार किमीचा टप्पा पार केल्यानंतर पहिल्यांदा सायकल पंक्चर झाली. मात्र दरवेळी सचिनने खचून न जाता पंक्चर काढून आपला प्रवास सुरु ठेवला. यासाठी त्याला दरवेळी सायकलवरील ३० किलो वजनाचे सामान उतरवून पुन्हा सायकलवर बसवावे लागायचे आणि पंक्चर काढण्यापेक्षा हेच काम आव्हानात्मक असल्याचे सचिनने सांगितले. या संपुर्ण मोहिमेच्या अनुभवाबाबत सचिन उत्साहाने सांगतो की, या मोहिमेमुळे मला माझा देश कळाला.देशातील इतर भागाविषयी किंवा राज्याविषयी असलेले अज्ञान आणि गैरसमज सगळे दूर झाले. टीव्ही, वर्तमानपत्रांतून किंवा इतर माध्यमांतून जो भारत देश बघतो त्याहून कितीतरीपटीने वेगळा व अद्भुत असा आपला भारत देश आहे. प्रत्येक ठिकाणी आपण भारतीय असल्याची जाणीव होते. भाषा, परंपरा, चालीरीती हे सर्व आपण तयार केलेल्या मर्यादा किंवा बॉर्डर आहेत. पण या मोहिमेतून मी खरे भारतीयत्व अनुभवले.ज्या मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी ही मोहिम आखली होती त्याबाबत सचिन म्हणाला की, प्रत्येक राज्यामध्ये मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लोकांना माहिती घेण्यामध्ये खुप उत्सुकता होती. या मोहिमेद्वारे मानसिक आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करण्यात यशस्वी ठरलो हेच महत्त्वाचे ठरले. देशभरातील लोकांना असलेल्या समस्या कळाल्या, विविध माहिती मिळाली. आता माझ्यावरील जबाबदारी वाढली असून आयपीएच संस्थेसोबत पुढील कार्य करण्याचे नेवे आव्हान माझ्यापुढे आहे.प्रवास सचिनचा...महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, प. बंगाल, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा , दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात.आता मिशन ‘वर्ल्ड’ । सायकलवरुन भारत परीक्रमा केल्यानंतर आता पुढची मोहिम काय असे विचारले असता सचिनने आंतरराष्ट्रीय मोहिमेच्या विचारात असल्याचे सांगितले. २०१८ साली वयाची ४० वर्ष पूर्ण करणार असून किमान ४० देश तरी सायकलवरुन फिरण्याचा प्रयत्न करणार असे सचिन म्हणाला.सायकल ‘स्टेट्स सिम्बॉल’। मी ज्या-ज्या ठिकाणी गेलो तेथे सायकलवरुन आल्याने मला खुप सम्मान मिळाला. हा सायकलला मिळालेला सम्मान होता. आज तरुणाई बाईकच्या मागे आहे. त्यात वाईट काहीच नाही. मात्र सायकलला विसरता कामा नये. ज्यावेळी तरुणाईला महागड्या सायकलचे स्वप्न पडेल तेव्हा सायकल स्टेटस सिम्बॉल बनेल, असे सचिनने सांगितले.या मोहिमेसाठी सचिन जेव्हा निघाला होता तेव्हा काळजी म्हणून डोळ्यांत पाणी होते. आज तो परतला तेव्हा देखील डोळ्यांत पाणी होते पण ते आनंदाश्रू होते. त्याच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. तो रोज आमच्या संपर्कात होता. त्याची भेट कधी होते याची उत्सुकता होती. - पल्लवी गावकर (सचिनची बहीण)ठाणेकर असल्याचा अभिमानया मोहिमेमध्ये सुरुवातीला मी मुंबईहून आलो असल्याचे सांगायचो. मात्र नंतर ठाण्याहून आल्याचे सांगितले. तेव्हा लोकांना पोलिस ठाणे वाटायचे. मात्र ठाणे नावाचे शहर मुंबई नजीक असल्याचे सांगितल्यावर लोकांना आश्चर्य वाटले. या मोहिमेतून ठाणे जिल्हा, शहरचे नाव देशभरामध्ये पोहचवू शकलो याचा अभिमान आहे.- सचिन गावकर
अशी कामगिरी केवळ मराठी माणूसच करू शकतो!
By admin | Published: August 16, 2015 2:16 AM