पुणे : आज मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. याला कुठलाही राजकीय पक्ष, सरकार जवाबदार नाही तर या स्थितीला मध्यमवर्ग जवाबदार आहे असा थेट आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.
महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे आर्यभूषण पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संचालक मंडळाचे अंकुश काकडे, उपाध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात राजश्री शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्र. दि. शिंदे यांना कै. गोपाळ कृष्ण गोखले स्मृती आर्यभूषण पुरस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी यांना कै. नरुभाऊ लिमये स्मृती पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर, आमदार किशोर दराडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
पुढे ते म्हणाले की, सोशल मीडियानंतरमराठी भाषेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. भाषेत आमूलाग्र बदल झाले आहेत. संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतर आठ दहा वर्ष मराठी शाळा सुस्थितीत होत्या. मात्र, मराठीला आता किंमत नाही, असे मध्यम वर्गाला वाटायला लागले आणि अमेरिकेचे दरवाजे उघडायला लागल्यानंतर चित्र आमूलाग्र बदलले. त्यानंतर झपाट्याने मराठी शाळा बंद पडायला लागल्या.
पाटील म्हणाले की, सहकार क्षेत्र वाईट नाही. मात्र, त्याला कोणीतरी पुढाकार घेऊन वळण लावायला हवे. सहकार अनुभवल्याशिवाय कळत नाही.सहकाराचा अर्थ जे तुमच्याकडे नाही ते मला द्या, जे माझ्याकडे नाही ते तुम्हाला देतो आणि आपण मिळून उभारतो ती यंत्रणा असते. त्यात इदं न मम् तत्वाप्रमाणे वाटचाल करावी लागते. हल्ली लोकांच कुठल्याच गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही. हवामान खात्यापासून निवडणूक आयोगापर्यंत कुठल्याच विभागावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.