- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रपती पदासाठी सोमवारी महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ सदस्यांपैकी २८७ सदस्यांनी मतदान केले. तर एका राज्यसभा सदस्याने राज्यात मतदान केले. बहुजन विकास आघाडीचे आ. क्षितीज ठाकूर (नालासोपारा) परदेशात असल्यामुळे ते मतदानाला हजर राहू शकले नाही.विधानभवनात सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या मतदानात पुण्याच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सर्वप्रथम मतदान केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११.२५ मिनीटांनी मतदान केले.पहिल्या टप्प्यात एका तासात ८५ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री मदन येरावार, विजय देशमुख यांचा समावेश होता. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेते आणि आमदारांनी वेगवेगळे येत मतदान केले. आॅर्थर रोड तुरुंगात असणारे आ. छगन भुजबळ आणि आ. रमेश कदम यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दुपारी बारा पर्यंत १९१ मतदारांनी मतदान केले. दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण २५७ विधानसभा सदस्यांनी तसेच राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी मतदान केले. यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य सदस्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट यांच्यासह २८७ सदस्यांनी मतदान केले.
राज्यात एकमेव आमदार गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:51 AM