सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या समितीसमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी वाझेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देशमुख यांच्याशी जानेवारीत एकदाच भेटल्याची कबुली दिली असून ४.७० कोटींबद्दल कसलाही उल्लेख नाही, असा दावा देशमुख यांचे वकील ॲड. कमलेश धुमरे यांनी केला आहे.ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असतो. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिले असल्याचे त्यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ईडीच्या चौकशीत वाझेने बार मालकांकडून ‘नंबर वन’ व्यक्ती म्हणजे देशमुख हेच असल्याचे सांगितले जात आहे, त्याला आक्षेप घेत धुमरे यांनी याबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा केला. ईडीने तपासाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी करून ते म्हणाले, ‘आयोगासमोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे याने पैसे दिले असे सांगत नाही. त्याचा ईडी घेत असलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब दबावाखालीच असतो. सीआरपीसीमध्ये पोलिसांसमोर दिलेला जबाब स्वीकारला जात नाही. १०० कोटी रुपयांचा आरोप खोटा आहे. बारची संख्याही विसंगत आहे, असा दावाही घुमरे यांनी केला.
ईडीने आरती देशमुख यांना बुधवारी समन्स दिले आहे. त्या ६६ वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहेत, त्यांचा या व्यवहाराशी काही संबंध नाही, असा दावाही त्यांच्या वकिलांनी केला.