लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मॉडेल कृतिका चौधरी (२५) हिच्या हत्येचा गुंता सोडविण्यात अखेर अंबोली पोलिसांना सोमवारी यश मिळाले आहे. या प्रकरणी दोन ड्रग विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या सहा हजार रुपयांसाठी त्यांनी कृतिकाची हत्या केली. हे प्रकरण उघड करण्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने पोलीस वर्तुळात त्यांचे कौतुक केले जात आहे.कृतिकाला नशेचे व्यसन जडले होते. ज्यामुळे ती ड्रग विक्रेत्यांच्या संपर्कात होती. ही मैत्री तिच्या जिवावर बेतल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. कृतिकाच्या हत्येचा तपास अंबोली पोलीस आणि क्राइम ब्रांच समांतररीत्या करत होते. ज्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक दया नायक आणि त्यांचे पथक या प्रकरणी चौकशी करत होते. त्यानुसार शकील खान (३३) याला शिवाजीनगर आणि बादशाह उर्फ बासुदास दास (४०) याला पनवेलमधून अटक केली. यातील खान हा सनी नावाच्या एका ड्रग सप्लायरकडे काम करत होता. त्याने अमली पदार्थ विकत घेणारे अनेक ग्राहकही जमवले होते. ज्यात कृतिकाचादेखील समावेश होता. रात्री उशिरा खान कृतिकासाठी अमली पदार्थ घेऊन यायचा. २०१६ पर्यंत हे दोघे संपर्कात होते. मात्र नंतर अमली पदार्थाच्या एका प्रकरणात तीन महिन्यांसाठी खान तुरुंगात गेला. तेव्हापासून कृतिकाचा खानशी संपर्क तुटला होता. मात्र खानचे तिच्याकडे सहा हजार रुपये बाकी होते. जे देण्याच्या वादातून तिची या दोघांनी हत्या केली.काय झाले ‘त्या’ रात्री?खान कारागृहातून सुटल्यानंतर त्याचा साथीदार दास याच्यासह कृतिकाच्या घरी आला. मात्र तेव्हा घराला टाळे होते. त्यामुळे आधीच्या अनुभवानुसार रात्री उशिरा कृतिका भेटणार हे त्याला माहीत होते. त्यानुसार तो रात्री दोनच्या सुमारास कृतिकाच्या घरी गेला. सुरुवातीला तिने त्याला ओळखले नाही. नंतर ओळख पटविल्यावर ‘कैसे हो भय्या’ अशी त्याची विचारपूसही तिने केली. बऱ्याच गप्पा मारल्यानंतर अमली पदार्थांचे सहा हजार खानने तिच्याकडे मागितले. तेव्हा ‘पैसा अभी नही है’ असे उत्तर तिने त्याला दिले. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले. तेव्हा खानने हातात असलेले डस्टर कृतिकाच्या डोक्यावर मारले. रक्तबंबाळ होऊन ती खाली पडली, तेव्हा दासने तिचा गळा दाबला आणि तिला ठार मारले. त्यानंतर तिच्या अंगावरील सोनसाखळी, अंगठी आणि कानातले डूल काढून घेऊन फरार झाले.६० ड्रग विक्रेते आणि २४० संशयित!कृतिकाच्या हत्येप्रकरणी पोलीस पथकाने जवळपास २४० लोकांची चौकशी केली. तसेच कृतिका ड्रग विक्रेत्याच्या संपर्कात होती ही माहिती पोलिसांच्या हाती लागली. तेव्हा महिनाभरात मुंबई उपनगरातील ६० ते ७० ड्रग विक्रेत्यांची परेड पोलिसांनी घेतली. या दरम्यान मुंबईतील अनेक ड्रग सप्लायर शहर सोडून बाहेर पसार झाले. या चौकशीतच पोलीस पथकाला खान आणि दासबाबत माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला. ज्यात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
अवघ्या सहा हजारांसाठी झाली कृतिकाची हत्या!
By admin | Published: July 11, 2017 5:43 AM