मुंबई: मशिदींवरील भोंगे उतरवा, अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिला. त्याचे पडसाद राज्यासह देशात उमटले. राज यांनी आक्रमक हिंदुत्ववादाची भूमिका घेतली. त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळत असल्याचं दिसत आहे. मात्र भोंग्यांबद्दल राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षातील काही जण नाराज झाले. त्यांनी त्यांची नाराजी माध्यमांकडे बोलून दाखवली. त्यामुळे आता राज यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
आक्रमक हिंदुत्ववादाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज ठाकरे पुढच्या महिन्यात अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्याची तयारी मनसेकडून सुरू करण्यात आली आहेत. ट्रेन बूक करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना पत्र पाठवण्यात आलं आहे. राज यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे.
'माझ्या अयोध्या दौऱ्याबद्दल पक्षातील कोणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत. ते याबाबत बोलतील. इतर कुणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये,' असं राज यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'इतरही कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेचे भाषेचे भान राखावे,' अशी तंबी राज यांनी दिली आहे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे, अशी ताकीदच राज यांच्याकडून देण्यात आली आहे.