योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: चाकडोह येथील सोलर इंडस्ट्रीज येथे रविवारी झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा बळी गेला. शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र ती मदत त्यांच्या कायदेशीर वारसांनाच मिळेल याची दक्षता घेण्यात यावी अशी भूमिका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे.
सदर घटना ज्या कारखान्यात घडली तिथे स्फोटकांची निर्मिती आणि स्फोटकांचे उपपदार्थ निर्माण करण्याचे काम केले जाते. सदर इमारतीमध्ये 'टीएनटी' ची चाळणी चालू असताना स्फोटाची घटना घडली आहे. नुकतेच पुण्यातील तळवडे येथेही अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. अशा प्रकारच्या गंभीर घटना घडू नये म्हणून कडक उपायोजना करणे आवश्यक आहे. सोलर इंडस्ट्रीजचा कारखाना रेड कॅटेगरीचा असल्यामुळे कायद्यानुसार तेथे अधिक सुरक्षेची आवश्यकता असते. त्यामुळे कारखान्याने सुरक्षाविषयक योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
कारखाना कायद्यानुसार सर्व तरतुदी आणि नियमांच्या अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अपघातात मृत्यू पडलेल्या कामगारांना शासनाने व कारखान्याने जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या कायदेशीर वारसांना ताबडतोब आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच कारखान्याच्या परिसरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. मृत्युमुखी पडलेल्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.