संदीप वानखडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, बुलढाणा: राज्यात ६० हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती हाेणार असून, १५ ऑगस्टपासून पाेर्टल सुरू हाेणार असल्याची घाेषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान केली हाेती. त्यांनी वेळापत्रकही जाहीर केले हाेते; मात्र अजूनही पाेर्टल सुरू झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या बिंदुनामावलीचा घाेळ सुरूच आहे. सन २०१७ पासून शासनाने शिक्षकांची पदे पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षांनंतर शासनाने शिक्षक अभियाेग्यता परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर हाेऊन पाच महिने लाेटले तरी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. त्यातच शिक्षक भरती दाेन टप्प्यांत करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री केसरकर यांनी शिक्षकभरतीचे वेळापत्रक जाहीर केले हाेते. त्यानुसार १५ ऑगस्टपासून पाेर्टल सुरू हाेईल, असे त्यांनी सांगितले हाेते; मात्र २० ऑगस्ट उलटल्यानंतरही पाेर्टलला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याचे चित्र आहे.
पाच वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडलेलीच
- पवित्र पाेर्टलवर शासनाने २०१७ मध्ये सुरू केलेली भरती प्रक्रिया २०२३ मध्येही पूर्ण झाली नाही.
- १९६ व्यवस्थापनाच्या जागांसाठी सुरू असलेल्या मुलाखतींकडे अनेक उमेदवार पाठ फिरवत आहेत.
- पाच वर्षांत अनेक विद्यार्थ्यांनी दुसरी नाेकरी स्वीकारली आहे. त्यानंतर आता त्यांना मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.
- त्यातही मिळालेल्या शाळा लांबच्या असल्यानेही उमेदवार मुलाखतीसाठी येत नसल्याचे चित्र आहे.
नाेंदणीही सुरू हाेईना
पवित्र पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणीही सुरू झाली नाही. जवळपास दाेन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी पाेर्टलवर नाेंदणी करणार आहेत, त्यासाठी १० ते १५ दिवसांचा अवधी लागणार असल्याने शासनाने पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणी सुरू करावी, अशी मागणी हाेत आहे़.
... असे हाेते वेळापत्रक
- पवित्र पाेर्टलवर जाहिरात अपलाेड करणे : १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट
- उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची सुविधा : १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर
- निवड यादी प्रसिद्ध : १० ऑक्टाेबर
- मुलाखतीशिवाय घेण्यात येणाऱ्या शाळांसाठी कागदपत्र पडताळणी : ११ ऑक्टाेबर ते २० ऑक्टाेबर
- पदस्थापनेसाठी समुपदेशन : २१ ऑक्टाेबर ते २४ ऑक्टाेबर