मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला तिढा कायम आहे. एकीकडे शिवसेनेने थेट मुख्यमंत्रिपदावरच दावा ठोकला आहे. तर भाजपा मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापनेचा मुहुर्त लांबत चालला आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत मोठे संकेत दिले आहेत. युतीत राहण्यातच सर्वांचं आणि राज्याचं भलं आहे. मात्र शिवसेनेचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच सगळं ठरल्याप्रमाणे आणि सुरळीत पार पडलं तरच राज्यातील सरकार स्थिर राहील, असे विधानही संजय राऊत यांनी केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सरकार स्थापनेवरून आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणाऱ्या शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या संजय राऊत यांनी आज काहीसा नरमाईचा पवित्रा घेतल्याचे दिसून आले. युतीमध्ये राहण्यातच शिवसेना आणि भाजपाचं तसंच राज्याचं भलं आहे, असे राऊत यांनी सांगिलते. भाजपाने मंत्रिमंडळातील खात्यांच्या दिलेल्या प्रस्तावाबाबत विचारणा केली असता राऊत म्हणाले की, ''आम्ही येथे खाती वही घेऊन बसलेलो नाही. काही बातम्या पसरवल्या जात आहेत. प्रसारमाध्यमेही बातम्या पसरवत आहेत, याला पुड्या सोडणे म्हणतात, असा टोला राऊत यांनी लगावला.
शिवसेनेसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच भूमिका सर्वोच्च आहे. तसेच शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीही कायम आहे. युतीमध्ये राहण्यातच शिवसेना-भाजपा आणि राज्याचंही भलं आहे. मात्र आमचा सन्मान राखला जावा, असे राऊत म्हणाले. तसेच शिवसेनेचे आमदार संपर्कात आहे म्हणणाऱ्यांनाही राऊत यांनी टोला लगावला. यावेळी निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत कुठल्याही पक्षाचे आमदार फुटतील, असं वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.