मुंबई : ‘समता, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांच्या आधारे समाजनिर्मितीसाठी झटत राहणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी काढले. मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी होती आणि सुमारे चार दशके त्यांनी या शहरात व्यतीत केली, त्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा जागोजागी आढळतात. मुंबई महानगराशी असलेले बाबासाहेबांचे हे नाते, तसेच त्यांचे अलौकिक जीवन बृहन्मुंबई महानगरपालिकेने उत्कृष्ट अशा ‘कॉफी टेबल बुक’च्या माध्यमातून साकारले आहे, असेही त्यांनी नमूद केले.बृहन्मुंबई महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चा प्रकाशन सोहळा राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, ‘कॉफी टेबल बुक’चे लेखक व संपादक डॉ. नरेंद्र जाधव, ‘कॉफी टेबल बुक’ प्रशासकीय कामकाज समितीच्या अध्यक्षा व अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे उपस्थित होत्या. या प्रकाशन समारंभास विशेष अतिथी म्हणून शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषामंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, आमदार विजय गिरकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, काटोल मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष रणजित देशमुख हे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट पुस्तकांमध्ये त्याची गणना केली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि विचारांच्या आधारे आपण बलशाली देश घडविण्याच्या प्रक्रियेत सामील आहोत. विकासाच्या या प्रक्रियेत सर्वांनी योगदान द्यावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, ‘विसाव्या शतकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुद्रा उमटली आहे. समाजातील निराश्रित आणि पीडित घटकाला आपण माणूस आहोत, याची जाणीव करून देतानाच त्यांच्या हक्कांसाठी यांनी संघर्ष केला.’ (प्रतिनिधी)
...तरच बाबासाहेबांना खरी आदरांजली - राज्यपाल
By admin | Published: April 15, 2016 2:04 AM