मेट्रो, शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोडसारखे मोठे प्रकल्प उभारताना, राजकारण, प्रशासन आणि समाज यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. केंद्राने स्मार्ट सिटीची योजना आखली आणि या योजनेत मुंबईचा समावेश केला, म्हणजे शहर स्मार्ट झाले असे होत नाही. स्मार्ट सिटी उभी करताना, येथील मोठ्या वाहतूक प्रकल्पांसह पायाभूत सेवा-सुविधांमध्ये वाढ केली आणि पर्यावरणाची हानी होणार नाही, याची खबरदारी घेतली, तरच मुंबई ‘स्मार्ट’ होईल, असे ठाम मत ‘टेरी’च्या उपाध्यक्षा आणि डॉ. अन्नपूर्णा वांचेश्वरन यांनी मांडले. कफ परेड येथील जागतिक व्यापार केंद्रात दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) तर्फे शाश्वत विकास, पर्यावरण आणि स्मार्ट सिटी या संकल्पनेवर जागतिक शाश्वत विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेदरम्यान ‘टेरी’च्या उपाध्यक्षा डॉ. अन्नपूर्णा वांचेश्वरन यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’साठी विशेष मुलाखत दिली.स्मार्ट सिटीबद्दल आपले काय मत आहे?केंद्राने आखलेली ‘स्मार्ट सिटी’ ही योजना स्वागतार्ह आहे. मुंबईसारख्या मेगा सिटीचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला, ही आनंदाची बाब आहे. मात्र, मुंबईचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरण करताना येथील प्रत्येक घटकाचा विचार झाला पाहिजे. त्या अनुषंगाने ज्या-ज्या घटकाचा विकास होणे गरजेचे आहे, त्या प्रत्येक घटकाला सरकारने विकासात सामावून घेतले पाहिजे. केंद्राने स्मार्ट सिटीची योजना आखली, म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी संपली, असे होत नाही. उलटपक्षी राज्य सरकारची यात महत्त्वाची भूमिका आहे. राज्याला यात विकासाचा गाडा पुढे न्यायचा आहे.
कोणत्या घटकांचा विचार प्रामुख्याने व्हावा?स्मार्ट सिटीचा विचार करताना येथील झोपडपट्ट्यांचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे. झोपड्यांत राहात असलेल्या नागरिकांना सेवा-सुविधा मिळतात की नाही? याचा आढावा सरकारने घेतला पाहिजे. शौचालय, पाणी, शिधा अशा अनेक घटकांचा विचार केला पाहिजे. मुंबईमध्ये प्रत्येक घटकातील व्यक्ती वास्तव्य करत आहे. खरे तर श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव आपण करणे चुकीचे आहे किंवा आपण तो करताही कामा नये. मात्र, असे असले तरी गरिबातल्या गरिबाला सेवा-सुविधा मिळणे गरजेचे आहे आणि असे झाले, तर आपण स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करू शकू. महत्त्वाचे म्हणजे, मी जे म्हणते आहे, ते केवळ मुंबईपुरते नाही, तर प्रत्येक शहराला लागू होते.
सरकारने काय खबरदारी घ्यावी?मुंबईचा विकास करताना येथील पायाभूत सेवा-सुविधांवर भर पडणार नाही, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. मुंबईचा विकास करायचा? म्हणजे नेमके काय करायचे? असे अनेक प्रश्न आपणाला पडतील. आता तुम्ही पाहिले, तर मुंबईच्या विस्ताराला मर्यादा आहे. मुंबई आडवी पसरू शकत नाही आणि उभी पसरू शकते, असे आपण गृहित धरले, तरीही त्याला मर्यादा आहेत. याला उपाय म्हणून नवी मुंबईचा विस्तार होतो आहे. नवी मुंबईचे स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणजे मुंबईच्या विस्ताराला मर्यादा असल्या, तरी येथे आहेत त्या सेवा-सुविधा आणखी उत्तम करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत.
मेट्रोबद्दल काय सांगाल?मुंंबईत मेट्रो धावू लागली, याचा आनंद सर्वांनाच आहे. मात्र, दिल्लीच्या तुलनेत मेट्रो मुंबईत उशिराने धावू लागली, हेदेखील मी आवर्जून सांगते. कारण मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहर आहे. म्हणजेच या शहराच्या विकासाच्या कल्पना उर्वरित शहरांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. मेट्रो भूमिगत असो वा उन्नत असो. मेट्रो असणे हीच काळाची गरज आहे. कारण मेट्रोसारखे मोठे प्रकल्प शहरातील प्रवासाच्या पर्यायाने प्रवाशांच्या गरजा भागवू शकतात. उलटपक्षी माझे असे म्हणणे आहे की, मुंबईसारख्या मेगासिटीला मेट्रोसारख्या प्रकल्पांची अत्यंत आवश्यकता आहे.
ट्रान्स हार्बर लिंकबद्दल काय वाटते?शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक हा प्रकल्प उल्लेखनीय आहे. कारण यामुळे मुंबई आणि नवी मुंबई एकमेकांशी जोडले जाणार आहे. हे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तेव्हा होतील. मात्र, अशा प्रकल्पांची आखणी करणे किंवा ते राबवणे हे स्मार्ट सिटीला लाभदायक असते. अशा प्रकल्पांमुळे भविष्यात शहराच्या वाहतुकीवरील ताण कमी होणार असेल, प्रवाशांची गैरसोय टळून त्यांचा वेळ वाचत असेल, तर हे प्रकल्प नक्कीच फायदेशीर आहेत, यात तीळमात्र शंका नाही.
कोस्टल रोडला विरोध होत आहे, तुमचे म्हणणे काय?मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाबाबतही मी तेच सांगू इच्छिते. कोस्टल रोड प्रकल्पाकडे राज्य सरकार मोठ्या आशेने पाहत आहे. केंद्र सरकार आणि अथवा राज्य सरकारबाबत मी सकारात्मक बोलते आहे, याचा अर्थ असा नाही की, मी त्यांची बाजू घेते आहे. जे प्रकल्प शहराला दिलासा देणारे असतील, ज्या प्रकल्पांमुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलणार असेल, असे प्रकल्प निश्चितच फायदेशीर असतात. कोस्टल रोडमुळे इंधन, वेळ अशा असंख्य गोष्टी वाचणार आहेत. म्हणजे मेट्रो, शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड हे प्रकल्प स्मार्ट सिटीला पूरक असून, ते शहराला तारक आहेत.
पर्यावरणाचा ऱ्हास कसा थांबवणार?मेट्रो, शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड हे प्रकल्प उभारताना पर्यावरणाची हानी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी या संदर्भात मांडलेल्या सूचनांसह हरकतीचा आदर करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण विकासाची व्याख्या करायची झाली, तर त्यामध्ये केवळ वाहतूक येत नाही, तर यामध्ये पर्यावरणासारखा महत्त्वाचा घटक येतो. परिणामी, मोठे प्रकल्प उभे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची खबरदारी घेतलीच पाहिजे. पर्यावरण तज्ज्ञ असो, मच्छीमार असोत किंवा सर्वसामान्य मुंबईकर असोत. प्रत्येकाने मांडलेल्या विचाराचा आदर केला पाहिजे. असे केले तरच मोठे प्रकल्प मार्गी लागतील.
स्मार्ट सिटीसारखा प्रकल्प कसा यशस्वी होईल?स्मार्ट सिटी उभी करायची झाली, तर राजकारण, प्रशासन आणि समाज यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. होते कसे की, आपल्याकडे नेतृत्व आहे. मात्र, त्याचा फायदा आपणाला होत नाही किंवा आपण तो करून घेत नाही. याचे कारण राजकारण, प्रशासन आणि समाज या घटकांमध्ये सुसंवाद नाही. नेतृत्व असले, तरी त्याचा फायदा होत नाही. मग अशा वेळी त्या तिन्ही घटकांनी एकत्र येत, स्मार्ट सिटी आणि ‘मास प्रोजेक्ट’ राबवण्यासाठी एकत्र आले पाहिजे, विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे. कोणताही प्रकल्प राबवताना आवश्यक घटकाचा विचार लक्षात घेतला पाहिजे, तर कुठे स्मार्ट सिटीसारखे प्रकल्प यशस्वी होतील.
शाश्वत विकास म्हणजे नेमके काय?या प्रश्नाचे उत्तर आपणापैकी कोणीच नीट देत नाही. कारण आपण शाश्वत विकासाची व्याख्या समजावून घेत नाही. शाश्वत विकास म्हणजे, समाजातल्या प्रत्येक घटकाचा किमान विकास झाला पाहिजे. कोणताही घटक विकासापासून वंचित राहता कामा नये. भविष्याचा विचार करताना, प्रकल्प उभे करताना, येथील लोकसंख्येचाही विचार झाला पाहिजे. स्मार्ट सिटी असा नुसता शब्दप्रयोग चालणार नाही, तर स्मार्ट सिटीसाठी राज्य आणि केंद्राने विशेषत: केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे.
तापमानाच्या वाढीचा फटका मुंबईलाही बसतो?राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न चिघळला आहे. नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देश ग्लोबल वॉर्मिंगच्या मुद्द्यांवर कळकळीने बोलत आहेत, हे उल्लेखनीय आहे. जागतिक तापमानवाढीचा फटका मुंबईलाही बसत आहे, हे आपण नाकारून चालणार नाही. कारण यापूर्वी मुंबईत आलेला महापूर, तापमानात होत असलेली वाढ हे त्याचेच परिणाम आहेत. म्हणून मेट्रो, कोस्टल रोड आणि ट्रान्स हार्बर लिंक यासारखे मोठे प्रकल्प उभे करताना, पर्यावरणाचा विचार झालाच पाहिजे, यात तीळमात्र शंका नाही.(मुलाखत - सचिन लुंगसे)