पुणे : एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या देखील भाजपावर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. याच दरम्यान मुंडे यांना शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची 'ऑफर' मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी 'या' ऑफरबाबत महत्वाचं विधान करताना मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबतचा 'सस्पेन्स' देखील कायम राखला आहे.
संजय राऊत यांनी पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहेत.त्यांचे माझ्याशी चांगले संबंध देखील आहे. पण त्यांना आमच्याकडून कुणी शिवसेनाप्रवेशाची ऑफर दिली याची मला माहिती नाही. पण मुंडे यांना याप्रकारची 'ऑफर' शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरे हेच देऊ शकतात.
शरद पवार आमचे नेते आहेत, राज्यपाल शरद पवारांना नेता मानतात त्याचे स्वागत करतो. पण राज्यपालांनी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे पाठवायला हवे. राज्यपालांना शरद पवारांचे मार्गदर्शन हवं असेल तर मी पवारसाहेबांना विनंती करेन की तुम्ही राज्यपालांना मार्गदर्शन करा, राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये या शब्दात शिवसेना नेते संजय राऊतां यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना जोरदार टोला लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकारबद्दल केलं राऊत यांचे महत्वाचे विधान... '' महाराष्ट्रात काही लोकांना महाविकास आघाडी सरकार अस्तित्वातच येणार नाही असा पूर्ण विश्वास होता. परंतू, माझ्यासारख्या काही लोकांना राज्यात सत्तांतर होऊन याप्रकारे तीन पक्षांचे मिळून सरकार बनवता येईल असे खात्रीपूर्वक वाटत होते. आणि तसे करून देखील दाखवले. यादरम्यान काही लोकांमध्ये ठाकरे सरकार १५ दिवसांत कोसळेल अशा पैजा सुद्धा लागल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारची लवकरच वर्षपूर्ती होते आहे. आणि आमचे सरकार पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असून ते पाच वर्ष टिकेल असे ठाम मत संजय राऊत यांनी नोंदवले आहे...''