पुरेशा पावसाशिवाय पेरण्या करू नका : कृषी सहसंचालकांचे शेतकऱ्यांना आवाहनयवतमाळ : पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भात केवळ दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. ही पिकेही विहिरीतील पाण्यावर जगविली जात आहेत. जून महिना संपत आला तरीही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात सरासरी १५२ मिमी पाऊस पडतो. परंतु आतापर्यंत केवळ ४१ मिमी म्हणजे २७ टक्केच पाऊस पडला आहे. पाच जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ४० लाख हेक्टर आहे. त्यापैकी केवळ दोन टक्के म्हणजे ५५ हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे. ही पेरणीही शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्याच्या बळावर आणि मोठा धोका पत्करून केली आहे. त्यात ४८ हजार हेक्टरमध्ये प्री-मान्सून कॉटन, तीन हजार ५०० हेक्टरमध्ये सोयाबीन तर अडीच हजार हेक्टरमध्ये तुरीचे आंतरपीक घेतले आहे. दरवर्षी जून अखेरपर्यंत बहुतांश पेरण्या आटोपलेल्या असतात. परंतु यावर्षी केवळ दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. ही पिकेही ग्लास आणि गुंडाने पाणी देऊन वाचविली जात आहेत. पावसाअभावी जंगलातील चारा संपल्याने ही हिरवी पिके पक्षी आणि जनावरांचे खाद्य बनली आहे. कृषी खात्याने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. दोन ते तीन दिवस सलग पाऊस आणि जमिनीत पुरेशी ओल आल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी केले आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत. पेरणी झालेल्या सोयाबीनची मुळे उघडी पडली आहेत. शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा करावी, जुलैमध्येही कापूस, सोयाबीन या पिकांची पेरणी करता येईल. मात्र मूग, उडीद या पिकाची पेरणी करू नये. १५ जुलैनंतर कापूस, सोयाबीन ऐवजी मका, सूर्यफूल या सारख्या पर्यायी पिकांचा विचार करावा, असे आवाहन कृषी खात्यातर्फे करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पश्चिम विदर्भात केवळ दोन टक्के पेरण्या
By admin | Published: June 25, 2014 1:19 AM