ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 8 : नोटबंदीमुळे देशभरात आर्थिक तंगीचे चित्र आहे. सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर मोठमोठ्यांना नोटबंदीचा फटका बसला आहे. तास न् तास बँकेत आणि एटीएमसमोर उभे राहूनही अनेकांना मनासारखी रक्कम उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास होत आहे. नागपुातील एका चोरीच्या घटनेत नोटबंदीमुळे चोरट्यांनीही चरफड अनुभवली. चक्क दोन दोन एटीएम फोडूनही चोरट्यांच्या हाती केवळ पाच हजारांची रक्कम लागली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली चोरीची ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. जरीपटक्याच्या जागृतनगरात तथागत चौकाजवळ स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम आहे. रविवारी पहाटे चोरट्यांनी एटीएमच्या कक्षात प्रवेश केला. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर दोन पैकी एक एटीएम फोडण्यात चोरट्यांना यश आले. लाखोंची रोकड मिळणार, असे कल्पना चित्र रंगविणा-या चोरट्यांचा मात्र काही वेळेतच भ्रमनिरास झाला. एटीएममध्ये केवळ पाचच हजारांची रक्कम होती. ती ताब्यात घेतल्यानंतर चिडलेल्या चोरट्यांनी तोडफोड करून तेथील २० हजारांचे कॅमेरे चोरून नेले. एटीएममध्ये चोरी झाल्याची बाब रविवारी सकाळी उघडकीस आली. मात्र, सुटीचा दिवस असल्यामुळे की काय, जरीपटका पोलिसांकडे दुपारनंतर तक्रार पोहचली. पोलिसांनी चौकशीचे औपचारिकता पूर्ण करून गुन्हा दाखल करण्यापर्यंतची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सायंकाळ केली. त्याची माहिती पोलिसांच्या माहिती केंद्रात रात्री उपलब्ध झाली. मिळाले ते घेऊन पळालेनोटबंदीच्या निर्णयामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत बँका आणि एटीएमसमोर रक्कम काढण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळतात. दिवसभर नोटा काढणा-यांची वर्दळ असल्याने काही तासातच बरेच एटीएम कॅशलेस होतात. तर, काही एटीएममध्ये मोजकीच रक्कम राहते. चोरट्यांनी हात मारलेले एक एटीएम कॅशलेस होते. तर, दुस-या एटीएममध्येही मोजकीच रक्कम असल्याने एटीएम फोडण्यात यश येऊनही फारशी रक्कम त्यांच्या हाती लागली नाही. त्यामुळे मिळाली ती रक्कम घेऊन चोरटे पळून गेले.
दोन दोन एटीएम फोडूनही चोरट्यांच्या हाती केवळ पाच हजार
By admin | Published: January 08, 2017 11:06 PM