नितिन पंडीत
- लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: शासनाकडून ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यास सध्या सुरुवात झाली आहे . मात्र भिवंडी मनपाच्या कार्यक्षेत्रात सध्या लसींचा साठा अपुरा असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. लसीचा साठा अपुरा असल्याने भिवंडीत गुरुवारपासून फक्त दोनच ठिकाणी लस देण्यात येणार आहे. अपुऱ्या लस साठ्यामुळे भिवंडीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भिवंडी शहरात ४५ वर्ष वयोगटातील व त्यावरील नागरिकांसाठी लसीकरणासाठी महापालिकेच्या वतीने स्व इंदिरा गांधी रुग्णालय, खुदाबक्ष हॉल, भाग्य नगर, ईदगाह नागरी आरोग्य केंद्र, मिल्लत नगर नागरी आरोग्य केंद्र, नवी वस्ती नागरी आरोग्य केंद्र, देवजी नगर नागरी आरोग्य केंद्र, कामतघर गाव नागरी आरोग्य केंद्र, प्रभाग समिती ३ पद्मानगर व शिवाजी नगर स्टाफ क्वार्टर भाजी मार्केट संगमपाडा अशा दहा ठिकाणी महापालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र करण्यात आली होती. मात्र, मनपाकडे लसीचा साथ अत्यल्प असल्याने असल्याने गुरुवारपासून फक्त स्व. इंदिरा गांधी रुग्णालय व खुदाबक्ष हॉल या दोन ठिकाणीच लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लसीकरण करता येणार आहे.
भिवंडीत कामगार वस्ती व दाटीवाटीच्या लोकसंख्या असल्याने या ठिकाणी लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याने शहरात लसीचा पुरेसा साथ असणे आवश्यक आहे मात्र, मनपा प्रशासनाकडे असलेला लसीचा साथ अपुरा असल्याने शहरातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे .
विशेष म्हणजे १ मे पासून म्हणजे अवघ्या दोन दिवस नंतर १८ वर्ष वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार असल्याने आताच मनपाकडे लसीचा अपुरा साथ असल्याने दोन दिवसानंतर भिवंडी मनपा लसीकरणाचे कशा पद्धतीने नियोजन करणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.