एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीने केली होती सत्तेत जायची तयारी; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 08:47 AM2023-07-04T08:47:55+5:302023-07-04T08:50:24+5:30

गेल्या वर्षीच ५४ पैकी ५१ आमदारांच्या या विचाराच्या पत्रावर सह्यादेखील झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले

Only when Shinde revolted did the NCP prepare to come to power; Praful Patel's secret blast | एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीने केली होती सत्तेत जायची तयारी; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीने केली होती सत्तेत जायची तयारी; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

googlenewsNext

Praful Patel on Sharad Pawar NCP joining BJP: गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर असतानाच राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपासोबत युती करावी असे पत्र शरद पवार यांना दिले होते, असा मोठा खुलासा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी केला. राष्ट्रवादीचे नेतृत्व वेळेवर निर्णय घेण्यात अयशस्वी ठरले आणि एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले, असेही पटेल यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तसेच, 2022च्या मध्यातच भाजपसोबत जाण्याची राष्ट्रवादीची प्रक्रिया सुरू झाली होती, असा दावाही त्यांनी केला.

"केवळ आमदारच नाही तर राष्ट्रवादीचे नेते आणि तळागाळातील कार्यकर्ते हे सरकारचा एक भाग बनले पाहिजेत अशी तेव्हा भावना होती. अनेक आमदारांना मतदारसंघासाठी निधी वाटप, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आदी समस्यांना सामोरे जावे लागत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असल्याने हे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील अशी आमची अपेक्षा आहे," असे टीओआयला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल म्हणाले. अजित पवारांनी मांडलेल्या मुद्द्याचा पुनरुच्चार करताना पटेल म्हणाले, "राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नेत्यांना असे वाटते की जर पक्ष शिवसेनेशी जुळवून घेऊ शकत असेल तर भाजपशी हातमिळवणी करण्यात काहीच गैर नाही. सेनेसोबत आमचे अनेक दशकांपासून वैचारिक मतभेद होते, पण तरीही आम्ही सरकार स्थापन केले. आम्ही मोठ्या राष्ट्रहितासाठी भाजपसोबत हातमिळवणी केली, ही विचारप्रक्रिया नवीन नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो," असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस सरकारचा भाग कसा बनला, यावर पटेल म्हणाले की एकदा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तपशीलवार माहिती काढण्यासाठी सतत संवादात गुंतले होते. "आतापर्यंत राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या आणखी आमदारांचा समावेश केला जाईल. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार खात्यांच्या वाटपावर चर्चा करत आहेत," असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Only when Shinde revolted did the NCP prepare to come to power; Praful Patel's secret blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.