मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही कोरोना संसर्गाची स्थिती पूर्ण नियंत्रणात नाही. त्यामुळे आता लगचेच मास्कमुक्ती वा पूर्ण निर्बंध काढून टाकण्याच्या चर्चेला अल्पविराम द्यायला हवा, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली आहे. कोरोना नियंत्रणानंतर भविष्यात सर्व बाबतीत संसर्गाची स्थिती अभ्यासून राज्य शासनाकडे निर्बंध शिथिलतेची शिफारस कऱण्यात येणार असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले.कोविडखेरीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे, मात्र पुढील १० ते १५ दिवसात यात शिथिलता आणली जाईल. यात प्रत्येक वैद्यकीय, आरोग्यसेवेच्या संस्थेचे नियम याविषयी वेगळे असतात. त्या अनुषंगाने या चाचण्यांविषयी अंतिम निर्णय घेतला जातो. भविष्यात नवीन म्युटंट न आल्यास सार्वजनिक सोहळे, हाॅटेल, पर्यटन यावरचे निर्बंध काढण्यात येतील. मे-जून महिन्यापर्यंत कोरोना नियंत्रणाची स्थिती अधिक सुधारली असेल, त्यानंतर लवकरच एन्डेमिक प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे. भविष्यात कोविड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गंभीर आजारी पडण्याचा धोका कमी होईल. याचा अर्थ बहुतांश लोक हे गंभीर आजारी पडणार नाहीत, जुने किंवा नवे व्हेरिएंट एकत्र आले तरी आपल्यापैकी बहुतांश जणांना सामान्य कोरोना विषाणूसारखी सर्दी होईल, नाक चोंदणं किंवा डोकेदुखीसारखा त्रास होईल आणि काही काळाने बरे व्हाल, अशी माहिती कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे.
जगभरात कोरोना एखाद्या उद्रेकासारखा आढळला म्हणून आपण त्याला जगभर पसरलेली महासाथ (पॅन्डेमिक) म्हणत आहोत. हा आजार एन्डेमिक होणे म्हणजे तो आपल्या वातावरणाचा नियमित भाग होणे आणि त्या त्या ठिकाणच्या वातावरणानुसार तो कमी प्रमाणात पण नियमित आढळत राहणे. जसे फ्लूसारखे आजार हिवाळा, पावसाळा या वातावरणात काही प्रमाणात वाढतात. क्वचित प्रसंगी स्थानिक उद्रेक होणे, याला एन्डेमिक होणे म्हणतात. हिवताप, क्षय, एचआयव्ही यासारखे आजार एन्डेमिक आहेत, हे आपण याच अर्थाने म्हणतो.