Sanjay Raut Open Challenge: भाजपाशी युती करून २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींना सामोरे जाणाऱ्या शिवसेनेने नंतर मात्र वेगळी वाट धरली. भाजपाची साथ सोडून २०१९ मध्ये राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. पण यात सरकारमध्ये शिवसेनेच्या नेतेमंडळींना मोठ्या प्रमाणावर गळचेपी झाल्याने एकनाथ शिंदे यांनी सुमारे ४० आमदारांसोबत बंडखोरी केली आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. शिंदे गटाला आमदारांनंतर शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक यांचा पाठिंबा मिळाला. तशातच आज शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी दिल्ली शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. शिंदे गटाला वाढता पाठिंबा पाहता अनेक जण गेल्या अडीच वर्षात संजय राऊतांबाबत असलेली खदखद जाहीरपणे सांगताना दिसत आहेत. तशातच, शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी तर राऊतांना ओपन चॅलेंज दिलं.
"मी माझ्या जिल्ह्यातील शिवसेनेचा संस्थापक आहे. १९८६पासून मी शिवसेनेची एक-एक शाखा स्थापन करत जिह्यातील शिवसेना वाढवली आहे. गेली १५ वर्षे मी बुलडाणा जिल्ह्याचा संपर्कप्रमुख म्हणून काम केलं. आमच्यावर सातत्याने असे आरोप केले जातात की शिवसेनेने या लोकांना खूप काही दिलं. काहींना आमदारकी दिली, काहींना खासदारकी दिली आणि आता हे गद्दार झाले. पण मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की आम्ही सगळ्यांनी शिवसेनेच्या सुरूवातीच्या काळात उपाशी राहून शिवसेना वाढवली. जिल्ह्यांत फिरून बाळासाहेब ठाकरेंचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे शिवसेना आज इतकी विस्तारली आहे", असे खासदार जाधव म्हणाले.
संजय राऊतांना 'ओपन चॅलेंज'
"एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देण्याचा आम्हा खासदारांचा निर्णय यास कारणीभूत असणारी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या अवतीभवती असणारी चांडाळ-चौकडी. हे लोक जनतेशी कुठेही संबंधित नाहीत. हे लोक कायम उद्धव ठाकरेंना चुकीचं मार्गदर्शन करतात. त्यांना चुकीची माहिती देतात आणि त्यांना लोकांपासून दूर ठेवतात. त्यामुळे ही अवस्था शिवसेनेवर आली आहे. जर हे लोक म्हणत असतील की शिवसेनेमुळे तुम्हाला इतकं सारं मिळालं. तर माझं संजय राऊतांना थेट आव्हान आहे की बाकी सगळं सोडा... आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संजय राऊतांनी शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन कुठल्याही प्रभागातून नगरसेवक म्हणून तरी निवडून येऊ दाखवावं", असा रोखठोक विधान एबीपीमाझाच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रतापराव जाधव यांनी केलं.
विनायक राऊतांबद्दलही नाराजीचा सूर
"विनायक राऊत यांच्यावरही आम्हा खासदारांची तीव्र नाराजी आहे. तुम्ही संसदेचे रेकॉर्ड काढून पाहिलंत तर त्यात तुम्हाला दिसेल की शिवसेनेच्या खासदारांना देण्यात आलेल्या वेळपैकी ७० टक्के वेळ हा विनायक राऊत आणि अरविंद सावंत हेच बोलत असायचे. आम्हाला बोलू दिलं जात नव्हतं. आमच्या जिल्ह्यातील कामं होत नव्हती. आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी आमच्या विरोधातले पालकमंत्री जिल्ह्यात देण्यात आले होते. त्यामुळे आम्ही सत्तेत असलो तर गेली अडीच वर्षे आमच्या जिल्ह्यात आम्ही विरोधी पक्षनेतेच होतो", अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखवले.