पुणे : रजपूत वीटभट्टीतून सुधीर फडके भुयारी मार्गाकडे जाणारा रस्ता खासगी मालकाने बॅरिकेड्स लावून बंद केला आहे, महापालिका प्रशासनाने यावर तोडगा काढून हा रस्ता खुला न केल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा व शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिला आहे. नदीपात्रात बॅरिकेड्स लावून रजपूत वीटभट्टीतून जाणारा रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत आमदार मेधा कुलकर्णी यांनी कुणाल कुमार यांची भेट घेतली. या वेळी भाजपाचे गटनेते गणेश बिडकर, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे उपस्थित होत्या. त्याचबरोबर शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे, गजानन थरकुडे, राजेश पळसकर यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.रजपूत वीटभट्टीतून जाणारा रस्ता वहिवाटीचा असतानाही २०५ खाली हा रस्ता आखून त्याची अंमलबजावणी का करण्यात आली नाही, वहिवाटीचा रस्ता अचानक का बंद केला गेला, याबाबतची विचारणा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. प्रशासनाकडून ब्ल्यू लाइनचे कारण सांगूण रस्ता रखडला असल्याचे सांगण्यात येत आहे; े मग नदीपात्राला लागून असलेल्या इमारतींना कशाच्या आधारे परवानगी देण्यात आली आहे, याची विचारणा भाजपाच्या शिष्टमंडळाकडून आयुक्तांना करण्यात आली आहे. तांत्रिक कारण न दाखविता हा रस्ता तातडीने पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. एरंडवणा गावाच्या नकाशामध्ये या रस्त्याचा पाणंद रस्ता म्हणून उल्लेख आहे, पाणंद रस्ता अशाप्रकारे अचानक बंद करता येत नाही, रस्ता बंद करणे ही दंडेलशाही आहे. पालिकेने जागामालकाला नुकसान भरपाई देऊन जागा ताब्यात घ्यावी व रस्ता सुरू करावा, अशी मागणी श्याम देशपांडे यांनी केली आहे.
नदीपात्रातील रस्ता त्वरित खुला करावा
By admin | Published: May 21, 2016 12:57 AM