ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला २१ जुलैपासून सुरूवात होणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, म्हणून विविध ठिकाणी अभ्यासकेंद्रातूनही माहिती दिली जाणार आहे. पदवी, पदव्युत्तरच्या ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे निकाल मिळालेले नाहीत, त्यांनी पुढील वर्षासाठी कायम नोंदणी क्रमांकाचा वापर करून प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले आहे. साळुंखे म्हणाले की, मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठीचे नियमित प्रवेश हे २१ जुलै ते ३१ आॅगस्टदरम्यान आॅनलाइन नोंदणी करून घेता येतील. तर विलंब शुल्कासह १ ते १५ सप्टेंबर आणि अतिविलंब शुल्कासह १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी असेल....................आयडॉल प्रवेशाला मुहूर्त कधी?एकीकडे मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा झाली असली, तरी मुंबई विद्यापीठातून दूरस्थ शिक्षण देणाऱ्या आयडॉलला मात्र प्रवेशाचा मुहूर्त सापडत नाही आहे. गेल्यावर्षी २५ जूनला आयडॉलच्या पदवी, पदव्युत्तर प्रवेशाची प्रकिया सुरू झाली होती. मात्र यंदा जुलै महिना अर्धा संपला, तरी प्रवेश प्रक्रिया घोषित केलेली नाही. मुंबई आणि नजीकच्या परिसरातील हजारो विद्यार्थी आयडॉलच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत आहेत.