वंचितांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी १९८९ मध्ये नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. तीन दशकांत लाखो वंचितांना उच्च शिक्षण मिळाले. आता गोदावरी नदीवर संशोधनाला चालना देण्यासाठी योजना आखली आहे. सात राज्यांतून जाणाऱ्या गोदावरी नदीकाठची शास्त्रीय, परंपरा आणि समृद्धीची माहिती संकलित करणे यामुळे शक्य होणार आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांनी दिली. विद्यापीठाचा तिसावा वर्धापन दिन रविवारी साजरा होत असून, त्यानिमित्ताने त्यांनी विद्यापीठाच्या वाटचालीवर ‘लोकमत’शी संवाद साधला.वंचितांना उच्च शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या विद्यापीठाच्या वाटचालीबद्दल काय वाटते?शिक्षणापासून वंचित असलेल्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या दूरदृष्टीने या विद्यापीठाची स्थापना झाली. त्या वेळी प्रथम कुलगुरू म्हणून डॉ. राम ताकवले यांची नियुक्ती झाली. आज विद्यापीठात सहा लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. त्यात वंचितांचा वाटा मोठा आहे. विद्यापीठात सध्या ३९ हजार आदिवासी विद्यार्थी लाभ घेत असल्याचे आढळले आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ शिक्षण देत असताना अडचणी येत नाही. उलट अनेकदा कमवा आणि शिका योजनेअंतर्गत त्याचा लाभ मिळाला आहे.विद्यापीठाने गुणवत्ता वाढीसाठी काय उपक्रम हाती घेतले आहेत?शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या ठिकाणी यापुढे अभ्यासकेंद्र असणार नाही, तर शैक्षणिक वातावरणाच्या दृष्टीने वरिष्ठ महाविद्यालयातच दिले जाईल. अल्पसंख्याकांच्या शिक्षण संस्थांसाठी मात्र सूट असेल कारण त्यांना मूळ प्रवाहात आणणे हे महत्त्वाचे आहे. फार क्वचित सेवाभावी संस्थांच्या (एनजीओ) जागेत केंद्र दिले जाईल. दर्जेदार साहित्य उपलब्ध होत आहे.परीक्षा आणि निकाल यावर सर्वत्र वाद होतात, यावर काय दक्षता घेतली जाते?सर्व परीक्षा केंद्रांत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. हे खर्चीक असले तरी महत्त्वाचे काम आहे. शिवाय विद्यापीठाने परीक्षा केंद्रावरील उत्तरपत्रिका विभागीय केंद्रामार्फत विद्यापीठात पाठविल्यानंतर स्कॅनिंग करून त्या आॅनलाइनच कॅपवर तपासण्याची सोय केली आहे. परीक्षकाला बायोमेट्रिक हजेरी सक्तीची आहे. संगणक अधूनमधून पासवर्ड विचारून परीक्षकच पेपर तपासत आहे ना, याची खात्री करून घेतो.मुक्त विद्यापीठाच्या वतीने कोणता खास उपक्रम?नाशिक हे कुसुमाग्रजांचेही स्थान असल्याने विद्यापीठाने कुसुमाग्रज अध्यासन सुरू केले आहे. त्यासाठी २ कोटींची तरतूद असते. त्या माध्यमातून गोदावरी नदीचा प्रवास आणि त्यासंदर्भातील सर्व माहितीवर संशोधन प्रकल्प राबविण्याची कल्पना पुढे आली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अनुभव असलेले आमदार हेमंत टकले आणि अन्य मंडळींनी ही कल्पना सुचविली आहे. नाशिक (त्र्यंबकेश्वर) हे गोदावरी नदीच्या उगमस्थानी आहे. त्याच ठिकाणी हे विद्यापीठदेखील आहे. नदी, त्याभोवतीची सुपीकता, गोदाकाठची संस्कृती, भाषा, पिके अशा विषयांच्या अनुषंगाने मोठे संशोधन होऊ शकते. तेच करण्याचा मानस आहे. विद्यापीठाकडे थोडे मनुष्यबळ वाढले की काहीतरी करता येईल.नॅक आणि पारंपरिक विद्यापीठांचे आव्हान गुणवत्तेसाठी चांगलेचशासनाने आता पारंपरिक विद्यापीठांनादेखील दूरशिक्षण पद्धतीने शिक्षण देण्याची परवानगी दिली आहे. अर्थात, त्यासाठी दूरशिक्षण पद्धतीच्या शिक्षणाचे नियम त्यांना पाळावे लागणार आहेत. अशा विद्यापीठांमुळे मुक्त विद्यापीठासह देशभरातील दूरशिक्षण देणाºया संस्थांना आव्हान निर्माण होणार असले तरी ते चांगलेच आहे. नॅकच्या बाबतीतदेखील असेच आहे. दूरशिक्षण देणाºया विद्यापीठाला आता नॅक अॅक्रिडेशन बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबत निकष ठरविण्याची कामे सध्या सुरू असून, त्यामुळेच विद्यापीठांचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे.
( शब्दाकंन- संजय पाठक)