- चंद्रकांत कित्तुरे, कोल्हापूर
लुई ब्रेल याने लिपी तयार करून दृष्टिहीनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. सध्याच्या आधिनिक तंत्रज्ञानाच्या युगात जॉस (jaws), टॉक बॅक (Talk back) यासारख्या स्क्रीन रीडर तंत्रज्ञानाने दृष्टिहीनांसाठी आॅनलाईन विश्वदेखील खुले झाले आहे.लहानपणी अपघाताने दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या ब्रेल यांनी आठ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर १८२९ मध्ये स्पर्शज्ञानाने लिहिता, वाचता येणारी सहा बिंदूंची लिपी शोधून काढली. दृष्टिहीन लोकांना नवी दृष्टी देणारी ही भाषा ‘ब्रेल लिपी’म्हणून जगभरात मान्यता पावली. आज, बुधवारी ब्रेल यांची २०८ वी जयंती आहे. या ब्रेल लिपीचा पुढचा टप्पा म्हणजे स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरचा शोध. या सॉफ्टवेअरने दृष्टिहीनांसाठी अवघे आॅनलाईन विश्वच खुले केले आहे. जॉस प्रामुख्याने संगणकासाठी, तर टॉक बॅक मोबाईलसाठीचे सॉफ्टवेअर आहे. यामुळे दृष्टिहीन व्यक्ती केवळ स्पर्शाद्वारे संगणक, मोबाईल हाताळू शकते, वृत्तपत्र, पुस्तके वाचू शकते; पण हे सॉफ्टवेअर खूप महागडे आहे. ५० ते ६० हजार रुपये त्यासाठी मोजावे लागतात. शासकीय नोकरीतील दृष्टिहीन कर्मचाऱ्यांना शासनाकडून ते मिळते. इतर दृष्टिहीनांनांसाठी शासनाने ते सवलतीच्या दराने किंवा मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी दृष्टिहीन मित्रांची मागणी आहे.भारतात दीड कोटीहून अधिक दृष्टिहीनजगभरातील दृष्टिहीनांची संख्या साडेचार कोटींहून अधिक आहे. त्यात भारतातील सुमारे दीड कोटी दृष्टिहीनांचा समावेश आहे. कसे होते वाचन?जॉस किंवा टॉक बॅक हे सॉफ्टवेअर व्हॉईस ओव्हरद्वारे स्क्रीन रीडरचे काम करते. दिलेल्या आदेशाप्रमाणे मजकुराचे (टेक्स्ट स्पीच) वाचन करते. ते दृष्टिहीनांना ऐकायला मिळते. व्हॉईस ओव्हरच्या माध्यमातून आपण काय करीत आहोत हे कळते. त्यानुसार आपल्याला हवा तो आदेश देता येतो. एखादी वेबसाईट ओपन करणे, बातमी वाचणे, ई-मेल करणे, व्हॉट्सअॅप, फेसबुकसारखे सोशल मीडिया हाताळणे हे सर्व करता येते. गुगल मॅप्सच्या आधारे ते एकट्याने प्रवासही करू शकतात.स्मार्टफोन किंवा आयफोनसारख्या महागड्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर इनबिल्ट असते. शासनाने दृष्टिहीनांना सवलतीच्या दराने स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावेत. -सतीश नवले, सचिव, प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लार्इंड.