ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार संस्कृती युवा प्रतिष्ठानने वर्तकनगर येथे दहीहंडी साजरी केली. त्यात ठाणे-मुंबईतील १५३ मंडळांनी सहभाग घेतला होता. या वेळी मुंबईच्या ‘जय जवान पथका’ने पाच थर लावून सलामी दिली. दहीहंडी न बांधता केवळ सलामी देऊन हा उत्सव साजरा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांनंतरही येथे गोविंदांचा जल्लोष, उत्साह दिसून आला. नावीन्यपूर्ण पद्धतीने रचलेले मनोरे येथील आकर्षण ठरले. शेवटच्या थरावर बालगोविंदाला चढवण्यास आमदार प्रताप सरनाईक यांनी मनाई केली. अभिनव पद्धतीने थर लावणाऱ्यांनाही योग्य ते मानधन दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले. घाटकोपरच्या क्रांती गोविंदा पथकाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने थर रचले. शेवटच्या थरावरील गोविंदाने शिवाजी महाराज यांची वेशभूषा केली होती. चिरागनगरच्या सहयोग गोविंदा पथकाने तीन प्रकारांचे मनोरे रचले. या पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे तीन वेगवेगळे गोविंदा शेवटच्या थरावर चढले. मुलुंडच्या कुलस्वामिनी गोविंदा पथकाने व ऐरोलीच्या तरुणशक्ती गोविंदा पथकाने ‘फिरता मनोरा’ हा देखावा थराद्वारे सादर केला. मुलुंडच्या गावदेवी गोविंदा पथकाने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. ओम साईराम गोविंदा पथकातील वरच्या थरावर असलेला गोविंदाने ३० सेकंद थांबून सलामी दिली. विक्रोळीच्या उत्कर्ष गोविंदा पथकाने पर्यावरणाचा संदेश दिला. साईराम पथकातील सर्व गोविंदांनी डोळ्यांवर काळी पट्टी लावून मनोरे रचले. दरम्यान, ‘एक्स वन एक्स’ या डान्स ग्रुपने सादर केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. वैतीवाडी येथील जतन गोविंदा पथकाने मोजपट्टीच्या साहाय्याने पाच थर लावले.>जमिनीवर झोपून निषेधाचे आठ थरठाणे : जांभळीनाक्यावरील आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या या दहीहंडीचे खा. राजन विचारे यांनी आयोजन केले होते. दहीहंडीत गोविंदांना भिजवण्याकरिता उंचावर पाण्याचे कारंजे लावण्यात आले होते.शिवतेज महिला गोविंदा पथकाने आठ थरांची हंडी जमिनीवर झोपून लावत न्यायालयीन निर्बंधाचा निषेध केला. त्यानंतर, त्यांनी चार थरांची आयोजकांना सलामी दिली. या वेळी श्री गौरीशंकर सिद्धिविनायक, कापूरबावडीचा राजा, आम्ही डोंगरीकर, सह्याद्री गोविंदा पथक आणि नालासोपारा येथील श्रीगणेश बाल मित्र मंडळ आदी गोविंदा पथकांनी सलामी देत आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली.>संकल्प चौकात चार थरांचा बोलबाला ठाणे : संकल्प प्रतिष्ठानचे आयोजक आणि आमदार रवींद्र फाटक यांची दरवर्षी चौकातील रस्त्यावर उभारण्यात येणारी हंडी यंदा त्यांनी तेथील चक्क मैदानात नेली. तसेच ही हंडी २० फुटांपर्यंत होती. येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांना चारच थर लावण्यास सांगितले. ठाणे, मुंबईतील जवळपास १०८ पुरुष आणि महिला गोविंदा पथकांचा समावेश होता. वागळे इस्टेट येथील रघुनाथनगर, संकल्प चौकात यंदा तीनऐवजी दोन दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे दरवर्षी लावण्यात येणाऱ्या भल्यामोठ्या रकमांऐवजी यंदा कोणतीही रक्कम जाहीर केली नव्हती.
सलामी देत जपली ‘संस्कृती’
By admin | Published: August 26, 2016 3:03 AM