- जितेंद्र कालेकर , ठाणेप्रजासत्ताक दिनाच्या सुमारास भारतात किमान सात ठिकाणी ‘कलश’ ठेवा, या इसिसच्या शफी अरमान ऊर्फ युसूफ याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुदब्बीर शेख याच्यावर सोपवण्यात आली होती. हे कलश कधी व कुठे ठेवायचे, याचा निरोप येण्यापूर्वीच अमेरिकी गुप्तचर संघटनेच्या माहितीवरून ‘एनआयए’आणि ‘एटीएस’ने मुंब्रा येथे छापा घालून शेखला ताब्यात घेतल्याने एक मोठा कट उधळला गेल्याचा दावा एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. इसिसमध्ये ३०० तरुणांची भरती करण्याची जबाबदारीही शेख पार पाडत होता, असेही समजते.‘भारत में सात जगह कलश रख दो’, असा सांकेतिक भाषेतील मेल अमेरिकन गुप्तचर संघटना ‘सीआयए’ (सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी) ला मिळाला होता. त्याच माहितीचा पाठपुरावा केल्यानंतर एनआयए (भारताची राष्ट्रीय तपास संस्था) ला इसिसचा भारतामधील म्होरक्या मुदब्बीर शेख आणि त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली. आतापर्यंत आॅपरेशन कलशमध्ये सहभागी झालेल्या १८ ते २० जणांची धरपकड करण्यात आली आहे. मूळचा भारतीय असलेला युसूफ हा सीरियातून भारतात आपले जाळे पसरवण्यासाठी तसेच संभाव्य बॉम्बहल्ले करण्यासाठी मुख्य कमांडरची भूमिका बजावतो. त्यानेच भारतात आॅपरेशन ‘कलश’ राबवण्याचा कट आखला होता. तो यशस्वी करण्याची जबाबदारी मुदब्बीर आणि हैदराबादचा मोहम्मद नफीस खान यांच्यावर होती. मुदब्बीर शेख आणि मोहम्मद नफीस खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात पाय रोवण्यासाठी ‘इसिस’ने ‘जनूद उल खलिफा-ए-हिंद’ या नावाने आपले जाळे पसरविण्यास सुरुवात केली होती. इंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक ‘जिहादी’ सदस्य बनवायचे, हे लक्ष्य आहे. मुदब्बीरमार्फत तरुणांना जाळ्यात ओढायचे व नेटद्वारेच पुढील सर्व आदेश द्यायचे, अशी यंत्रणा युसूफने राबविली होती. एनआयएच्या ताब्यात न आलेले आणखी किमान १० ते १२ जण यात गुंतल्याची शक्यता आहे. किमान ३०० जणांना जिहादसाठी तयार करण्याची इसिसची योजना यशस्वी करण्याचा मुदब्बीरचा डाव होता, असेही ‘एनआयए’च्या तपासात उघड झाले आहे....तर ‘जन्नत’मध्ये प्रवेशइसिससारख्या अतिरेकी संघटनेत काम करून इस्लाम वाढविण्यासाठी काम करणे म्हणजे जन्नत (स्वर्गात) प्रवेश मिळविण्यासारखेच आहे, असा त्याचा भ्रम होता आणि तेच तो त्याची पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलीलाही सांगत होता. हाच संदेश इतरांना देऊन त्यांनाही यात ओढण्याचा प्रयत्न त्याचा सुरू होता, असे सूत्रांनी सांगितले.मुदब्बीरकडे मिळाले स्फोटकाचे साहित्य : मुदब्बीरकडे स्फोटके मिळाल्याच्या वृत्ताला सुरुवातीला एटीएसकडून अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. मात्र, त्याच्याकडे टायमर, सर्किट तयार करण्याचे मटेरियल आणि काही प्रमाणात फॉस्फरस अशी बॉम्ब बनविण्याची सामग्री मिळाल्याची माहिती त्याच्या घरावर धाड टाकणाऱ्यांपैकी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी ‘लोकमत’ला दिली.मुदब्बीरच्या सासऱ्यांनी दिल्लीला जाणे टाळलेमुदब्बीर शेख याचे सासरे अहमद मिया हे सध्या कमालीच्या मानसिक तणावाखाली असून न्यायालय मुदब्बीरबाबत कोणती भूमिका घेते, ते स्पष्ट झाल्याखेरीज दिल्लीला न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दिल्लीला जाण्याचे रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने आपण जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आॅपरेशन ‘कलश’ उधळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2016 1:32 AM