सातारा - सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या देशाचा आत्मा आहे. ऑपरेशन लोटसच्या नावाखाली देशाचा हा आत्माच नष्ट करण्याची भूमिका भाजपाने घेतली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. सातारा येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात्त पवार बोलत होते.
पवार म्हणाले, 'धार्मिक तेढ निर्माण करून परस्परांना भिडविण्याचे पाप भाजपने केले आहे. काहीही करून सत्ता मिळवणे आणि ती मिळत नसेल तर सत्ता संघर्ष वाढवणे ही भाजपची धोकादायक नीती झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश लोक फोडून भाजपाने सरकार आणले. सत्ता मिळाली नाही आणि लोकांनी नाकारले तर सत्ता आणि संपत्तीचा वापर करून लोकं फोडायची, त्याचसोबत संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करायची. हे सूत्र भाजपाने स्वीकारले आहे असं त्यांनी म्हटलं.
सामना अग्रलेखाचा घेतला समाचार
राष्ट्रवादीत आम्ही काय केले ते संजय राऊतांना माहिती नाही. पक्षाचे सहकारी अनेक गोष्ट बोलतात, वेगवेगळी मतेही असतात पण ते बाहेर जाऊन प्रसिद्ध करत नाही. हा आमच्या घरातला प्रश्न आहे. आम्ही नेतृत्व तयार करतो, त्यामुळे कुणी आमच्याबद्दल लिहिले, हा त्यांचा अधिकार आहे परंतु आमच्या दृष्टीने त्याला किंमत नाही. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असं सांगत शरद पवारांनी सामना अग्रलेखाचा समाचार घेतला आहे.