पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 09:01 PM2024-12-11T21:01:03+5:302024-12-11T21:02:16+5:30
Nana Patole, Congress vs BJP: चर्चेपासून पळ काढण्यासाठी पाच दिवसांचे अधिवेशन; रात्रीच्या अंधारात मते वाढवून लोकशाहीचा खून असेही केले आरोप
Nana Patole, Congress vs BJP: जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' झाले. आता लोकसभेतही असाच प्रकार सुरु आहे. भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ऑपेरेशन लोटस’ आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे घणाघाती आरोप केले.
रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा खून!
नाना पटोले पुढे म्हणाले, "विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना आहे. आपल्या मतावर दरोडा टाकल्याची जनतेच्या मनात शंका आहे. मारकडवाडीनंतर अशी भावना देशपातळीवर वाढीस लागली आहे. ग्रामसभा ठराव करून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करत आहेत. रात्रीच्या अंधारात ७६ लाख मते कशी वाढली ते निवडणूक आयोगाने अद्याप सांगितले नाही. रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा खून केला असून निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिले नाही तर सर्वोच्च न्यायालयातही जाऊ."
"भाजपा युती सरकारचे पहिले अधिवेशन नागपुरात होत आहे. राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. महागाई, बेरोजगारी, नोकरभरती, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला हमीभाव देणे अशा मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट ३ लाख रुपयांची कर्ज दिली पाहिजे, नोकरीभरती कशी करणार अशा विविध मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा नागपूरच्या अधिवेशनात होणे अपेक्षित आहे, यासाठी नागपूर अधिवेशन कमीत कमी एक महिन्याचे असावे अशी मागणी केली होती पण भाजपा युती सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन सरकार चर्चेपासून पळ काढत आहे," अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली.
मविआत वाद नाही!
"विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत वाद नाही. तीनही पक्ष एकत्र बसून विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित करतील व नागपूर अधिवेशनात सरकार यावर निर्णय घेईल. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेता व गटनेता ठरवण्याचे सर्व अधिकार पक्षश्रेष्ठींना दिले आहेत, त्यावरही लवकरच निर्णय होईल," अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.