मुंबई - १७ व्या लोकसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात युती आणि आघाड्यांची मोर्चेबांधणीही झाली आहे. दरम्यान, आज लोकसभेची निवडणूक झाल्यास महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा युतीला फटका बसण्याची शक्यता असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांमध्ये घसघशीत वाढ होण्याचा अंदाज झी २४ ने केलेल्या सर्व्हेमधून समोर आला आहे. या सर्व्हेनुसार राज्यात आज निवडणूक झाली तर शिवसेना आणि भाजपा युतीला १२ जागांवर फटका बसणार असून, युतीला ३० जागांवर समाधान मानावे लागेल. तर २०१४ च्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या आघाडीची कामरिगी या निवडणुकीत सुधारण्याची शक्यता असून आघाडीला एकूण १८ जागा मिळतील असा अंदाज आहे. या सर्वेमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात भाजपाला १६, शिवसेनेला १४, राष्ट्रवादीला १०, काँग्रेसला ७ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र राज ठाकरेंची मनसे आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकाही जागेवर विजय मिळणार नाही, असे या सर्व्हेत म्हटलेआहे.
विभागवार पाहिल्यास मुंबईत शिवसेना आणि भाजपा युतीचा वरचष्मा राहणार आहे. येथील ६ पैकी पाच जागा शिवसेना भाजपा युतीच्या पारड्यात जातील. तर केवळ एका जागेवर काँग्रेसला विजय मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणामध्ये शिवसेनेचे एकतर्फी वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. कोकणातील सहा पैकी पाच जागांवर शिवसेनेला विजय मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाच्या खात्यात एक जागा जाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विभागात अपेक्षित यश मिळणार नाही. तसेच नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षालाही खाते उघडता येणार नाही.
उत्तर महाराष्ट्रातील ८ जागांपैकी चार जागा भाजपाला तर शिवसेनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला दोन आणि राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र राष्ट्रवादीचे वर्चस्व राहणार आहे. राष्ट्रवादी ५ तर काँग्रेसला एक जागा मिळेल, तर भाजपाला २ आणि शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. स्वाभिमानीच्या खात्यात एक जागा जाईल. मराठवाड्यामध्ये युती आणि आघाडीत अटीतटीच्या लढाई आहे. येथील आठ जागांपैकी भाजपाला ३ आणि शिवसेनेला १ जागा मिळेल. तर काँग्रेसला २ आणि राष्ट्रवादीला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये मात्र युतीचा बोलबाला राहण्याची शक्यता आहे. येथील दहा जागांपैकी ४ जागा भाजपाला तर ३ जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात राष्ट्रवादीला २ आणि काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागेल.
महाराष्ट्र एकूण जागा - ४८ शिवसेना-भाजपा युती - ३० काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी १८
विभागवार जागांचा अंदाज
मुंबई - भाजपा २, शिवसेना ३ , काँग्रेस १, राष्ट्रवादी 0
कोकण - भाजपा १ , शिवसेना ५, काँग्रेस 0, राष्ट्रवादी 0,
उत्तर महाराष्ट्र - भाजपा ४ , शिवसेना १ , काँग्रेस २ , राष्ट्रवादी १
पश्चिम महाराष्ट्र - भाजपा २, शिवसेना १, काँग्रेस १, राष्ट्रवादी - ५, स्वाभिमानी - १
मराठवाडा - भाजपा ३ - , शिवसेना १, काँग्रेस २, राष्ट्रवादी २
विदर्भ - भाजपा - ४ , शिवसेना - ३ , काँग्रेस १, राष्ट्रवादी २