नागपूर : दूधप्रश्नावरून महादेव जानकरांनी दिलेल्या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने ही लक्षवेधी राखून ठेवण्याचा आग्रह विरोधकांनी केला. त्यावेळी जानकर यांच्या मदतीला शिक्षणमंत्री विनोद तावडे धावून आले. पण विरोधक ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हते. सभागृहात सुरू असलेला गोंधळ पाहता, मुख्यमंत्र्यांनी हक्तक्षेप करत येत्या दोन दिवसात बैठक घेण्याचे मान्य केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही लक्षवेधी राखून ठेवली.राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट असून, दूध उत्पादकांना प्रति लिटर ५ रुपयांचे अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती. शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी दूध उत्पादकांच्या समस्येवर दाखल केलेल्या लक्षवेधी सूचनेवर पवार बोलत होते. कर्नाटक आणि गोव्यात दूध उत्पादकांना सरकारकडून थेट त्यांच्या खात्यात अनुदान देण्यात येते. त्याच धर्तीवर राज्य सरकारने योजना राबवावी, असेही त्यांनी म्हटले . सरकारने दुधाला २७ रुपये दर घोषित केला होता, परंतु हा दर अद्याप मिळू शकलेला नाही. दूध पावडर उत्पादकांना ३ रुपये अनुदान दिले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. दुधाच्या पावडरचा साठाच संपला नाही. सरकारने घेतलेल्या एकाही निर्णयाचा शेतकºयांना फायदा झालेला नाही, असा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच राज्यातील शेतकºयांना संपावर का जावे लागते याचा विचार सरकारने करावा, असेही ते म्हणाले.दुग्धविकास मंत्री जानकर यांना उद्देशून बोलताना पवार म्हणाले की, तुमच्या मंत्रिपदाच्या काळात दुधाच्या धंद्याचे तीनतेरा झाले. अशी नोंद इतिहासात होऊ नये याची काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी जानकरांना दिला. एकूणच या विषयावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिले.
दूध उत्पादकांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:52 AM