मुंबई : विदर्भ, मराठवाडा तसेच सोलापूर जिल्ह्यातील पाणीप्रश्नाचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. आक्रमक विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारला धारेवर धरले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोकांनी गदारोळ केल्याने कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. शेवटी उजनी धरणाच्या पाण्याबाबत शुक्रवारी बैठक घेण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी विचारलेल्या प्रश्नात राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. राज्याच्या विविध भागात पाणीप्रश्नाने उग्र रूप धारण केलं असून लोकांना शंभर दीडशे किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे आणि ही वेळ लोकांवर आली ती सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे, अशी टीका पवार यांनी केली. प्रणिती शिंदे, भारत भालके, राजेश टोपे यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली.वसमतमधील पन्नास गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी सकाळी व संध्याकाळी दोन तास वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांनी केली. शिवतारे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी गदारोळ केला. शेवटी गिरीश महाजन यांनीस्पष्ट केले, की उजनीतून पाणी सोडल्यानंतर ते मध्येच अनेक भागात उचलले जाते आणि ही गोष्ट वर्षानुवर्षे सुरू आहे. यंदा दुष्काळाची स्थिती अनेक भागात गंभीर आहे आणि मराठवाड्यातील धरणात तर अर्धा टक्काही पाणी नाहीे. मात्र, विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याने अखेर उपाध्यक्ष विजय औटी कामकाज १५ मिनिटांसाठीतहकूब केले. सभागृह पुन्हा सुरू झाले तेव्हा उजनीच्या पाणी प्रश्नावर शुक्रवारी सकाळी स्वतंत्र बैठक बोलावण्याचे निर्देश त्यांनी सरकारला दिले.शिवतारे यांच्या उत्तरावर आक्षेपजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सोलापूरला पिण्याचे पाणी देण्यासाठी अर्धा टीएमसी पाणी देताना चार टीएमसी पाणी सोडावे लागते. सोलापूरला अर्धा टीएमसी पाण्याची चार आवर्तने देताना सोळा टीएमसी पाणी उजनी धरणातून सोडावे लागते, असे स्पष्ट केले.शिवतारे यांच्या उत्तरावर पवार यांच्यासह सोलापूरच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. प्रणिती शिंदे यांनी, आधीच्या सरकारच्या काळात तीन दिवसांआड पाणी मिळायचे पण सध्या उजनी धरणात पाणी असतानाही आठ आठ दिवस पाणी मिळत नाही आणि सोलापूर महापालिकेतला मनमानी कराभार या गोष्टीला कारणीभूत आहे, अशी टीका केली.
पाणीप्रश्नावरून विरोधक आक्रमक; सभागृहात उजनीचे पाणी पेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 2:57 AM