श्रीनिवास नागे - सांगलीदिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात विरोधकांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतले. आबांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत विरोधक भुईसपाट झाले. निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा भाजपातील एका गटाचा डाव त्यांच्याच अंगाशी आला आणि मतदारांनी त्यांना जबर चपराक दिली.आबांच्या निधनानंतर होणाऱ्या या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनतार्इंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. सुमनतार्इंचे नाव पुढे येत असताना काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकाप, रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्षांनी येथून उमेदवार न देण्याचा निर्णय जाहीर केला. सुमनतार्इंचे नाव जाहीर होताच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही उमेदवार देणार नसल्याचे घोषित केले. मात्र या दरम्यान आबांचे कट्टर विरोधक, भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे अस्वस्थ होते. त्यांच्या गटातून घोरपडेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न झाला, पण तो फोल ठरल्याने घोरपडेंनी स्वप्नील पाटील या नवख्या उमेदवाराचे नाव पुढे केले. स्वप्नील पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामागे घोरपडेंचा गट असल्याचे लपून राहिले नाही. प्रत्यक्ष प्रचारात आणि मतदानादिवशी तर घोरपडे गटाची रसद बंडखोरामागे असल्याचे साऱ्यांनाच दिसून आले.सहानुभूतीची लाट असतानाही कोणताही धोका न पत्करता राष्ट्रवादीने दिग्गज नेत्यांची फळी प्रचारात उतरवली. घोरपडे गट विरोधात असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी त्वेषाने प्रचार केला. पाणी योजना पूर्ण करण्याचे आर. आर. आबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुमनतार्इंना निवडून देण्याचा मुद्दा राष्ट्रवादीने पुढे केला आणि आबांनी स्वत:च्या मतदारसंघात केलेल्या कामांची पोहोचपावती मतदारांनी सुमनतार्इंना मतांच्या रूपाने दिली. त्यांना तब्बल लाखाचे मताधिक्य देताना मतदारांनी विरोधकांचा पार कचरा करून टाकला. विरोधकांनी प्रचारात आणलेला घराणेशाहीच्या विरोधाचा मुद्दाही आपसूक खोडून टाकला गेला.एकंदरीत स्वत:चा गट शाबूत ठेवण्यासाठी लादलेली निवडणूक आणि विरोधासाठी विरोध करण्याची वृत्ती मतदारांनाच सहन झाली नाही. त्यांनी या निवडणुकीतून आबांच्या कार्याची धुरा सुमनतार्इंकडे सोपवत विरोधकांना चपराक दिली.च्निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हैसाळसह अन्य सिंचन योजनांच्या पाण्याचा मुद्दा अचानक प्रचारात आला होता. वीजबील-पाणीपट्टी थकल्याने म्हैसाळचे पाणी बंद होते. खरेतर त्यावेळीच तासगाव-कवठेमहांकाळच्या मतदारांना आर. आर. आबांची किंमत कळली होती. च्आबा असते तर दोन्ही तालुके पाच महिने पाण्याविना तडफडले नसते, हे वास्तव विरोधकही अमान्य करणार नाहीत. शेवटी पाणी सोडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपासह काही नेत्यांनी केला, पण पाणी सोडणे ही अपरिहार्यता होती. तसे झाले नसते तर पाण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधींना फोडले असते!