मुंबई - नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वि.दा. सावरकर यांच्याविषयीच्या वक्तव्यामुळेच गाजला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांचे नाव घेत भाजपवर टीका केली होती. त्यामुळे विधीमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपनेते आक्रमक झाले होते. मात्र आमदार बच्चू कडू यांनी यावरून विरोधीपक्षावर टीका केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी प्रश्नांवर विरोधकांना आक्रमक होता आले असते, परंतु तसं झालं नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
विधीमंडळात शेतकरी कर्जमाफीसंदर्भात काहीही चर्चा झाली नाही. या संदर्भात भूमिका घेणे विरोधी पक्षाचे काम असते. विरोधक वीर सावरकरांच नाव घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सावरकरांविषयीचं प्रेम महत्त्वाचं नसून यावरून राजकारण करता येतं का हे भाजपकडून पाहिले जात आहे. सावरकर यांच्यासारख्या महापुरषांचे नाव घेऊन भाजप राजकारण करेल, याची अपेक्षा केली नव्हती, असंही बच्चू कडू म्हणाले.
मला आज दिवसभरात 100 मॅसेज आले आहेत. कर्जमाफी कधी मिळणार, आर्थिक मदतीचं काय झालं अशी विचारणा आपल्याला होत आहे. शेतकऱ्यांना या अधिवेशनाकडून आशा असते. त्यात विरोधकांनी भावनिक मुद्दे समोर आणल्याने शेतकऱ्यांना अडचण होते. सावरकरांचा मुद्दा शेवटच्या दोन दिवसांत घेता आला असता, अस कडू यांनी सांगितले.
विरोधीपक्षात अभ्यासू नेते आहेत. त्यांना शेतकरी प्रश्नी आवाज उंचावून लोकांची मने जिंकता आली असती. मात्र त्यांनी तसं केल नसून आम्हाला शेतकऱ्यांपेक्षा सावरकराचांच मुद्दा महत्त्वाचं असल्याचे विरोधकांनी दाखवून दिल्याचे कडू म्हणाले.
दरम्यान कर्जमाफी हा मुद्दा तातडीचा नाही. कर्जमाफी व्यवस्थीत हातळण्याचा विषय आहे. कर्जमाफी ही केवळ मलपट्टी आहे. त्याची शस्त्रक्रिया आवश्यक आहे. त्यातून शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, असंही मत कडू यांनी मांडले. तसेच कर्जमाफीसाठी एक महिना तरी लागले, असंही त्यांनी सांगितले.