मुंबई : सर्वांना उत्कंठा असलेला लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. महाराष्टÑातील ४८ जागांवर काय होणार, याबाबत देशभर उत्सुकता आहे. राज्यातील जनता सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीला पुन्हा कौल देणार की, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या उमेदवारांना संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
गुरुवारी सकाळी आठ वाजतापासून मतमोजणी सुरू होणार आहे. अवघ्या तासाभरात कोणते उमेदवार आघाडीवर आहेत, हे कळू शकेल. यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटच्या स्लीप आणि ईव्हीएममध्ये नोंदविले गेलेले मत याची पडताळणी होणार असल्याने प्रत्यक्ष अधिकृत निकाल हाती येण्यासाठी विलंब लागू शकतो. मात्र तोपर्यंत मतदारसंघनिहाय कल हाती आलेला असेल.
अवघ्या सहा महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीचे भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचाराच्या निमित्ताने फडणवीस यांनी राज्य अक्षरश: पिंजून काढले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एखाद्या तरुण नेत्यालाही लाजवेल अशा प्रचंड उत्साहाने ही निवडणूक अंगावर घेतली. चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड असलेल्या पवारांच्या पारड्यात महाराष्ट्रातील जनता काय टाकते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे या सर्वांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू शरद पवार हेच होते. त्यामुळे पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, नातू पार्थ अजित पवार यांचे अनुक्रमे बारामती व मावळमध्ये काय होणार, याबद्दल उत्सुकता आहे. गेल्या वेळी केवळ चार जागा जिंकता आलेल्या राष्ट्रवादीला यंदा राज्यात किती जागा मिळणार, सुनील तटकरे, उदयनराजे भोसले या राष्ट्रवादीच्या प्रमुख शिलेदारांचे भवितव्य काय आहे याचा फैसला उद्या होणार आहे.
काँग्रेसने ही निवडणूक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविली. ऐन निवडणुकीत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी चिरंजीव सुजय यांच्यासाठी पक्षाविरुद्ध केलेली बंडखोरी, गडचिरोली-चिमुर मतदारसंघातील उमेदवार बदलावरून झालेला वाद, जागा वाटपाचा शेवटपर्यंत न संपलेला घोळ, पुणे आणि मुंबईतील उमदवार निश्चितीस झालेला विलंब या घडामोडींचा काय परिणाम झाला, हे उद्या कळेल.४८ जागांचे काय होणार?एक्झिट पोल्सचे कवित्व सरून प्रत्यक्ष निकालाचे वेध लागल्याने नेतेमंडळी आणि कार्यकर्ते यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. आता प्रतीक्षा आहे, ती आज जाहीर होणाºया निकालांची... कोट्यवधी भारतीयांच्या मनात एकच प्रश्न घोळतो आहे... नवे सत्ताधारी कोण? मतदार सत्ताधाऱ्यांना पुन्हा संधी देणार की, विरोधकांना सत्तेत बसवणार. राज्यातील ४८ जागांवर कुणाच्या पारड्यात किती मते पडणार, दिल्लीची किल्ली राज्यातील कुणाच्या कनवटीला असणार, हे पाहाणेही आता सर्वांसाठीच औत्सुक्याचे आहे.
कोणता मतदारसंघ सध्या कोणाकडे?भाजपा । नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, जालना, दिंडोरी, पालघर, भिवंडी, उ. मुंबई, ई. मुंबई, उ. मध्य मुंबई, पुणे, नगर, बीड, लातूर, सोलापूर, सांगली.शिवसेना । बुलडाणा, अमरावती, रामटेक, यवतमाळ-वाशिम, परभणी, औरंगाबाद, नाशिक, कल्याण, ठाणे, वायव्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, रायगड, मावळ, शिरूर, शिर्डी, उस्मानाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग.काँग्रेस ।हिंगोली, नांदेडराष्टÑवादी । बारामती, माढा, सातारा, कोल्हापूरस्वाभिमानी । हातकणंगलेउमेदवारांची पक्षनिहाय संख्याआघाडी : काँग्रेस २५ , राष्ट्रवादी १९,स्वाभिमानी शेतकरी संघटना २, वायएसपी १, बाविआ १महायुती : भाजप २५, शिवसेना २३इतर : बसपा २९, वंचित बहुजन आघाडी ४७,एमआयएम १, माकपा १, सपा २, जनता दल सेक्युलर १.मनसे फॅक्टर चालला का?महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उमेदवार न उभे करताही स्वत: रिंगणात उतरले होते. आपल्या खास शैलीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा जाहीर सभांमधून खरपूस समाचार घेतला. ‘लाव रे तो व्हीडिओ’ हे त्यांचे वाक्य परवलीचे बनले. राज यांच्या या झंझावाती प्रचाराचा फटका युतीला बसणार का? का लोकांनी फक्त सभांना गर्दी केली आणि मते मात्र दुसरीकडेच गेली, असे झाले? विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची ही रंगीत तालीम कशी वठते, हे उद्या पाहू.
वंचित बहुजनआघाडीचे काय?अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसींच्या एमआयएमला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी स्थापन करून सर्व ४८ मतदारसंघात उमेदवार उभे केले. स्वत: आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन ठिकाणी लढले. वंचित आघाडीने दिलेले सर्वसमावेशक उमेदवार आणि आंबेडकरांच्या सभांना झालेली गर्दी पाहाता या आघाडीबाबत कुतुहल निर्माण झाले. नांदेड, सोलापूर, सांगली, बुलडाणा, अकोला या मतदारसंघात ‘वंचित’ मुळे कमालीची चुरस निर्माण झाली होती. ही आघाडी काँग्रेस-राष्टÑवादीला अपशकून ठरेल, अशीही चर्चा झाली. आघाडीचे नेमके काय झाले, हे उद्याच कळेल.या निकालांबद्दल उत्सुकतामाजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (नांदेड), नितीन गडकरी (नागपूर), वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (अकोला व सोलापूर), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (हातकणंगले), केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना), संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे (धुळे), भाजप नेत्या पूनम महाजन (उत्तर मध्य मुंबई), अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट (पुणे), सुप्रिया सुळे (बारामती), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई) या दिग्गज उमेदवारांच्या भवतिव्याचा फैसला उद्या होणार आहे.