मुंबई : काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसने गेल्या १५ वर्षांत केलेली पापं आम्हाला फेडावी लागत असल्याचा पलटवार करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या काळात झालेले घोटाळे बाहेर काढण्याची तंबी देत विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘चर्चेतून मार्ग निघतो’, असा सल्ला आम्हाला गेली १५ वर्षे देणाऱ्या आघाडीने आज भूमिका बदलून आपल्या चहापानावर बहिष्कार टाकला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. या पार्श्वभूमीवर, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याला तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर देण्याचे फडणवीस सरकारने ठरविले असल्याचे स्पष्ट झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या रात्री झालेल्या बैठकीतही भाजपा-शिवसेनेने विरोधकांचे टीकास्र सर्व ताकदीनिशी परतविण्याचे ठरविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, मुस्लिम आरक्षणाबाबत आमच्या सरकारला जाब विचारणाऱ्या आघाडीच्या सत्ताकाळात मुस्लिम समाजाच्या हक्काच्या असलेल्या वक्फ बोर्डाच्या जमिनी कोणी कोणी बळकावल्या याची माहिती चौकशी अहवालातून राज्यातील जनतेसमोर याच अधिवेशनात आम्ही आणू. तेव्हा मुस्लिमांचे कैवारी कोण हे कळेलच, असा दमही मुख्यमंत्र्यांनी दिला. दमणगंगा खोऱ्यातील पाणी आमचे सरकार गुजरातला द्यायला निघाले असल्याचा विरोधकांचा आरोप निखालस खोटा आहे. या बाबत आघाडी सरकारने कोणता करार केला होता आणि त्यांनी गुजरातला दिलेले पाणी आम्ही कसे परत आणले याचा पत्रव्यवहारच राज्यासमोर मांडण्याचीआपली तयारी आहे, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)
विरोधकांचे घोटाळे अन् पापं काढण्याची तंबी
By admin | Published: March 09, 2015 2:19 AM