नागपूर : सरकारने १६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या मात्र त्यात विरोधी पक्षाच्या आमदारांना छदाम दिला नाही, त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी आज सभागृहात गदारोळ केला. या विषयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युध्दही झाले. पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयाला तोंड फोडले. हे सरकार सर्वांचे आहे. मात्र पुरवणी मागण्यात विरोधी पक्षाच्या आमदारांना एक रुपयाही देण्यात आलेला नाही. मागे एकदा आघाडी सरकारच्या काळात असे घडले होते. काहीजण न्यायालयात गेले होते. मात्र त्यानंतर असा पक्षपात कधीही आम्ही केला नाही पण भाजपा सरकारने घेतलेली भूमिका चुकीची आहे असेही भुजबळ म्हणाले. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील याच विषयाला हात घातला. ते म्हणाले, मागच्यावेळी आघाडी सरकारमध्ये हे असे घडले होते पण अध्यक्षांच्या दालनात त्यासाठी बैठक झाली. त्यावर तोडगा काढला गेला होता. तीच भूमिका याहीवेळी अध्यक्षांनी घ्यावी असे चव्हाण म्हणाले.मात्र मुख्यमंत्री फडणवीस या विषयावर आक्रमक झाले. विरोधक आणि सत्ताधारी असा भेदभाव आपल्याकडून कधीही होणार नाही. मात्र तुम्ही आम्हाला त्यावेळी एक रुपयाही दिला नव्हता हे मी सिध्द करून दाखवायला तयार आहे. आम्ही तेव्हा वेलमध्ये तीन दिवस बसून होतो.गेल्या पाच वर्षात तुम्ही विरोधी पक्षाला काहीही दिलेले नाही. पण तो आता इतिहास आहे. तुम्ही तसे वागलात म्हणून आम्ही तसे वागणार नाही. पण तुम्ही केलेला भेदभाव रेकॉर्डवर आणायचा म्हणून हे सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.त्यावर भुजबळ यांनी आम्ही तुम्हाला प्रत्येकवर्षी पैसे दिले आहेत. हे सिध्द करून दाखवतो, दिले नसतील तर राजीनामा देतो असे जोषात सांगितले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी देखील तुम्ही पैसे दिलेले नाहीत असे तेवढ्याच जोरात सांगितले. शेवटी तालिका अध्यक्षांनी चर्चेला सुरुवात करा, अशी विनंती करत कामकाज पुढे चालू केले. (प्रतिनिधी)
विरोधकांना पुरवणी मागण्यात ठेंगा!
By admin | Published: December 16, 2015 3:05 AM