अकोला : राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार विदर्भातील उद्योजकांना वस्त्रोद्योग उभारण्याची नामी संधी प्राप्त झाली असून, या धोरणानुसार भांडवल अनुदान व राज्य योजनेंतर्गत व्याज दरात सवलत देण्यात येत असल्याने, उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग संचालक रिचा बागला यांनी शुक्रवारी येथे केले. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग संचालनालयाच्या वतीने ह्यराज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरणह्ण या विषयावर एक दिवसीय परिसंवाद शुक्रवारी अकोला येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिचा बागला होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणूून अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, वस्त्रोद्योग सहसंचालक आर. एम. भुसारी व सादीकजमा, उद्योग विभागाचे सहसंचालक अशोक धर्माधिकारी, विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मस अँण्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष रमाकांत खंडेलवाल, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कैलास खंडेलवाल उपस्थित होते. वस्त्रोद्योग निर्मितीसाठी राज्यात अनुकूल वातावरण असल्याचे उद्योजकांना सांगताना, शासनाने सूतगिरण्या, तयार कपडे निर्मिती, जिनिंग-प्रेसिंग, तसेच प्रोसेसिंग इत्यादींच्या बळकटीकरणार भर दिला असल्याचे रिचा बागला यावेळी म्हणाल्या. विदर्भात कापूस मोठ्या प्रमाणात पिकत असल्याने, या भागात वस्त्रोद्योग प्रकल्प, टेक्सटाइल्स पार्क उभारण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. शासनाने राज्यातील एकूण ५११ व विदर्भातील ५८ प्रकल्पांसाठी ४0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ह्यमेक इन महाराष्ट्राह्णसोबतच ह्यमेक इन अकोलाह्णसाठी अकोला जिल्हय़ातील उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन केले. जिल्हय़ात वस्त्रोद्योग , टेक्सटाइल्स प्रकल्प उभारणार्या उद्योजकांना जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी जे.जे. स्पूनचे प्रवीण इंगोले, हिंगणघाट इंटिग्रेटचे अभिषेक अग्रवाल, आदींनी त्यांच्या वस्त्रोद्योग प्रकल्पांचे सादरीकरण केले. या परिसंवादाला अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या विदर्भातील जिल्हय़ांसह राज्याच्या इतर भागातील उद्योजकही मोठ्या संख्येने आले होते.
विदर्भातील उद्योजकांना वस्त्रोद्योग प्रकल्प उभारण्याची संधी - रिचा बागला
By admin | Published: November 07, 2015 3:04 AM