- वाचक-परिसंवादाचे आयोजन नागपूर : वाचकांच्या आवडीनिवडी जपण्याचे व्रत घेतलेल्या ‘लोकमत’ने येत्या दिवाळी अंकात वाचकांना सहभागी करून घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ‘लोकमत दिवाळी उत्सव २०१६’ या यंदा प्रकाशीत होणाऱ्या दिवाळी अंकात वाचक परिसंवादाचे आयोजन करण्यात येत असून, त्याचा विषय - ‘विवाह संस्थेसमोरील आव्हाने’ हा आहे. विवाह जुळवणे ही अलीकडच्या काळात एक मोठी समस्या झाली असल्याचे वास्तव आपण पाहत आहोत. आपल्यापैकी काहींच्या तो अनुभवाचाही भाग असू शकतो. उच्च शिक्षण व करियरमुळे मुला-मुलींचे वाढते वय, त्यांच्या जोडीदारांबाबत असलेल्या अपेक्षा, व्यक्तीस्वातंत्र्याची मागणी , लिव्ह इन रिलेशनशिपचे वाढते प्रमाण आणि जातीधर्माची बंधने अशा अनेक बाबी यात समाविष्ट असल्याचे दिसते. विवाह न जुळल्याने अविवाहित राहिलेल्यांचे प्रमाण येत्या काळात पूर्वीपेक्षा जास्त असू शकेल असेही भाकीत वर्तविले जाताना दिसते. विवाह जुळण्यामागे नेमक्या काय अडचणी आहेत, कुठली मानसिकता आडवी येत आहे, कोणत्या अपेक्षा वा गरजा अडथळे बनत आहेत. याखेरीज झालेल्या विवाहात नंतरच्या काळात बदललेल्या आवडीनिवडी, मतमतांतरे, वाढत जाणारा कंटाळा आणि परस्परांशी फारसे जुळत नसल्याची जाणीव याही गोष्टी आता चर्चेत याव्या अशा आहेत. या सर्व मुद्यांवर वाचकांनी आपली मते वा अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे. आपली प्रतिक्रिया नेमक्या शब्दात मांडावी. शब्दमर्यादा ३०० हून अधिक नसावी. प्रतिक्रिया ३० जुलै २०१६ पूर्वी, लोकमत दिवाळी अंक २०१६, वाचक- परिसंवाद, लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ, नागपूर ४४००१२ या पत्त्यावर पाठवावी. ज्या लेखकांना आपले नाव प्रकाशीत होऊ नये असे वाटत असेल त्यांनी तशी नोंद आपल्या प्रतिक्रियेसोबत पाठवावी.
लोकमत दिवाळी उत्सव २०१६ मध्ये वाचकांना सहभागी होण्याची संधी
By admin | Published: June 12, 2016 5:40 AM