मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्ताधारी भाजप पक्षात सामील होण्यासाठी चढाओढ लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीतील २० हून अधिक नेत्यांनी पक्षांतर केले असून आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याने राष्ट्रवादीची वाताहत झाली असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला पुन्हा उभं करण्याचं आव्हान पक्ष नेतृत्वासमोर आहे. त्यावर तोडगा काढण्यास राष्ट्रवादीमध्ये तयारी सुरू झाल्याचे समजते.
दिग्गज नेत्यांपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधून तरुण नेते देखील वेगळे होत आहेत. वैभव पिचड, संग्राम जगताप आणि शिवेंद्रसिंह राजे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तरुणांना संधी देणार असल्याचे सांगण्यात येते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच तरुणांना आगामी विधानसभेत संधी देणार असल्याचे संकेत दिले. विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा निकष असला तरी पक्षाकडून तरुणांना संधी देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. तसेच तरुणांना संधी दिल्याने पक्षाला पुन्हा नव्या दमाने उभं करण्यास मदतच होईल, असंही त्यांनी सांगितले.
याआधी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी देखील तरुणांना संधी देणार असल्याचे म्हटले होते. मला इच्छूक तरुणांची यादी द्या, त्यांना तिकीट देतो, असंही पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीकडून तरुण नेते निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीत सुरू असलेल्या पक्षांतरामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे.