मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीवरून लातूरमधील औसा मतदार संघात भूमिपुत्रविरुद्ध उमेदवार असा संघर्ष झाला होता. पवार यांच्या उमेदवारीवरून रास्तारोको देखील करण्यात आले. नाराज झालेले शिवसेनेचे दिनकर माने, किरण उटगे आणि बजरंग जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आता वरिष्ठांच्या कानपिचक्यानंतर माने आणि उटगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, जाधव अद्याप अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारी निश्चित झाल्यामुळे व्यथीत झालेले शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने आणि भाजप नेते किरण उटगे यांनी बंडोखोरीचा पावित्रा घेत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र वरिष्ठांनी समजूत काढल्यानंतर दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यासाठी तानाजी सावंत लातूरमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी माने यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले.
माने यांच्याकडून हा मतदार संघ शिवसेनेला सोडण्याचा आग्रह करण्यात आला होता. तर उटगे यांनी ही जागा भूमीपुत्राला द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. पवार यांना विरोध दर्शविण्यासाठी मतदार संघात तीन तास रास्तारोको देखील करण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारी निश्चित झाल्याने रास्तारोकोची पक्षाकडून फारशी दखल घेतली गेली नाही. मात्र सावंत यांनी माने यांच्या समर्थकांची मनधरणी केल्यानंतर माने आणि उटगे यांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु, जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
दरम्यान प्रमुख दावेदारांनी माघार घेतल्याने पवार यांचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला आहे. पवार यांच्यासमोर काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार बसवराज पाटील यांचे आव्हान आहे.